

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्वरी येथे गृहनिर्माण (हाऊसिंग बोर्ड) च्या जागेमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर भवन बांधण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यासाठी हाऊसिंग बोर्डला ६.१० कोटीची निधीही जागेसाठी दिलेला आहे. हाऊसिंग बोर्डकडून जागा उपलब्ध झाल्यानंतर लगेच आंबेडकर भवनाची पायाभरणी केली जाईल.
केंद्रिय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्याकडेही चर्चा करण्यात आलेली असून राज्य आणि केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हे भवन बांधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. शून्य प्रहराला पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी आंबेडकर भवन कधी बांधणार असा प्रश्न विचारला होता. आंबेडकर भवन होत नसल्यामुळे राज्यातली एससी-एसटी नागरिक नाराज असल्याचे सांगून आंबेडकर भवन लवकरात लवकर बांधण्याची मागणी केली.
मंत्री सुभाष फळदेसाई
त्यावर फळदेसाई यांनी त्याला सविस्तर उत्तर दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भवन उभारण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचेही फळदेसाई म्हणाले. शून्य प्रहाराला आमदार संकल्प आमोणकर यांनी दाबोळी विमानळावरील टॅक्सी चालकाचा विषय उपस्थित केला तर क्रुझ सिल्वा यांनी आपल्या मतदारसंघातील रस्त्यांचा विषय उपस्थित केला.
पंधरा दिवसात आयुक्त नेमणार : मंत्री तवडकर
गोवा राज्य एसटी, एससी आयुक्तलयासाठी पूर्णवेळ आयुक्त येत्या पंधरा दिवसांमध्ये नियुक्त केला जाईल, असे आश्वासन आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी दिले. सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.
बोरकर म्हणाले की, गोवा राज्य एसीएसटी आयोगाला गेले आठ महिने आयुक्त नसल्यामुळे विविध कल्याणकारी योजना रखडल्या आहेत त्यावर तवडकर यांनी पंधरा दिवसांत आयुक्त नियुक्त करू, असे आश्वासन आमदार वीरेश बोरकर यांना दिले.