Goa Fish Market Rates  Pudhari File Photo
गोवा

Vasco Baina Fish Market | आधी मासळी मार्केटच्या दुरुस्तीचे बघा; नंतर कारवाई करा

Vasco Baina Fish Market | बायणातील घाऊक मासळी विक्रेत्यांची मागणी : इमारतीची दुरवस्था; सुविधांची वानवा

पुढारी वृत्तसेवा

वास्को : पुढारी वृत्तसेवा

बायणातील मासळी मार्केटाची दुरुस्ती न करता खारीवाडा येथील घाऊक मासळी विक्रेत्यांना बायणातील मासळी मार्केटात व्यवसाय करण्यासंबंधी आवाहन करण्यात आल्याने येथे विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. संबंधितांनी आधी बायणातील मासळी मार्केटच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, त्यानंतरच घाऊक मासळी विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पाऊले उचलावीत, अशी मागणी घाऊक मासळी विक्रेत्यांनी केली आहे.

खारीवाडा येथे काहीजण घाऊक दराने मासळी विकतात. त्यामुळे तेथे ग्राहकांची गर्दी असते. तथापी तेथील घाऊक विक्री बंद करण्याची मागणी मासळी मार्केटातील विक्रेत्यांकडून होत आहे. घाऊक मासळी विक्रेत्यामुळे मासळी मार्केटात ग्राहक फिरकत नाही. त्यामुळे आमचा व्यवसाय होत नसल्याचा दावा मार्केटातील विक्रेत्या करतात. याप्रकरणी शुक्रवारी (ता. २२) आकस्मिक पाहणी करण्यात आली.

त्यावेळी मुरगावचे नगराध्यक्ष गिरिष बोरकर, मुख्याधिकारी सिध्दीविनायक नाईक, उपजिल्हाधिकारी प्रताप गावकर, मामलेदार प्रवीणजय पंडित, पोलिस निरीक्षक वैभव नाईक आदी उपस्थित होते. या विक्रेत्यांची सोय बायणातील मासळी मार्केटात करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्या विक्रेत्यांनी खारीवाडा येथील मासळी विक्री बंद करून, बायणातील मासळी मार्केटात मासे विकावे असे आवाहन त्यांनी केले होते.

तथापी शनिवारी याप्रकरणी कोणतीही हालचाल झालेली दिसून आली नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे बायणातील मासळी मार्केटाची पूर्णपणे दुदर्शा झाली आहे. या मार्केटाच्या छप्पराची मोडतोड झाल्याने पावसाळ्यात पाणी मार्केटात जमा होते. त्याप्रमाणे सगळीकडे अस्वच्छता दिसून येत आहे. दिवाबत्ती योग्यरित्या नसल्याने आतमध्ये काळोख पसरलेला असतो. लोखंडी सळ्याची दारे आहेत, त्याची मोडतोड झाली आहे.

गटाराची सफाई करण्यात आलेली नाही. इतर सुविधांचीही उणीवा आहेत. त्यामुळे त्या समस्या तातडीने दूर करण्याची आवश्यकता असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून त्या विक्रेत्यांना बायणातील मासळी मार्केटात जाण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे घाऊक मासळी विक्रेत्यांमध्ये नाराजी पसरली असून आधी सदरच्या मासळी इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT