Goa Fish Market Rates  Pudhari File Photo
गोवा

Vasco Fish Market | 'ते' मासे विक्रेते मार्केटमध्ये जाण्यास अनुत्सुक

Vasco Fish Market | मुरगाव पालिकेने घाऊक मासे विक्रेत्यांबाबत घेतलेला निर्णय बारगळण्याची चिन्हे

पुढारी वृत्तसेवा

वास्को: पुढारी वृत्तसेवा

खारीवाडा येथे घाऊक दराने मासे विक्री करणारे विक्रेते बायणातील मासे मार्केटात जाण्यास अनुत्सुक असल्याने मुरगाव पालिका मंडळाने घेतलेला निर्णय बारगळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्केटची दुरुस्ती करण्याच्या हालचाली थंडावल्याचा दिसून येत आहे. खारीवाडा येथे काहीजण धाऊक दराने (किलो पध्दतीने) मासे विक्री करतात.

त्यामुळे तेथे मासे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते. तसेच बोटीद्वारे सायंकाळच्या वेळी मासेमारी करून आलेले संबंधित तेथे मासे विकतात. ताजे व किलो पध्दतीने मिळणाऱ्या माशांना ग्राहकांची अधिक पसंती आहे. खारीवाडा येथे घाऊक पध्दतीने मासे विक्री करण्यास शहर भागातील मासे मार्केटातील मासे विक्रेत्यांची हरकत आहे. त्यामुळे काही वेळा वादही निर्माण झाले होते.

काही वेळा पोलिस व मुरगाव पालिकेने कारवाई करताना खारीवाडा येथील घाऊक मासे विक्री बंद केली होती. मासे जप्तही करण्याची कृतीही केली होती. तथापी तेथील मासे विक्री थांबली नाही. शहर भागातील मासे मार्केट इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर मासे विक्रेत्यांनी तेथे जाण्यास नकार दिला होता.

आधी खारीवाडा येथील घाऊक मासे विक्री बंद करा, त्यानंतरच आम्ही नवीन मार्केटात मासे विक्री करू, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे खारीवाडा येथे घाऊक पध्दतीने मासे विक्री होऊ नये यासाठी तेथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे तेथील मासे विक्री पूर्णपणे बंद झाली होती. परंतु नवीन मासे मार्केटात व्यवसाय सुरू झाल्यावर खारीवाडा येथे पुन्हा मासेविक्री सुरु झाली होती.

त्यामुळे मार्केटातील मासे विक्रेत्यांनी संताप व्यक्त केला होता. खारीवाडा येथील मासे विक्रेत्यांवर कारवाई करा, असे आवाहन मार्केटातील मासे विक्रेत्यांनी केले होते. याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी २२ एप्रिलला वास्कोचे आमदार दाजी साळकर यांच्यासमावेत एका संयुक्त बैठक घेण्यात आली होती. याप्रसंगी मुरगावचे नगराध्यक्ष गिरिष बोरकर, नगरसेवक, नगरसेविका, पोलिस अधिकारी, खारीवाड़ा येथे मासे विक्री करणारे विक्रेते थ इतर संबंधित उपस्थित होते. यावेळी खारीवाडा येथे घाऊक पध्दतीने मासे विक्री करणाऱ्यांनी बायणातील मासे मार्केटात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत निर्णय झाले, पण...

बैठकीत बायणातील मासे मार्केट अधिसूचित करण्यात आल्याने त्या मार्केटपासून एक किलोमीटर अंतराच्या व्यासामध्ये कोणालाही मासे विक्री करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. बायणातील मासे मार्केटपासून एक किलोमीटर अंतराच्या व्यासामध्ये मासे विक्री करणाऱ्याच्या विरोधात पोलिसांनी कारवाई करावी. तसेच बावणातील मार्केटची दुरुस्ती करण्यासंबंधीही निर्णय घेण्यात आले होते.

ग्राहक तुटण्याची भीती सतावतेय

बैठकीला उपस्थित असलेल्या घाऊक मासे विक्रेत्यांनी बायणा मासे मार्केटात जाण्याची तयारी दर्शविली होती. आता त्यांनी माघार घेतली असल्याचे समजते. खारीवाडा येथे गेली काही वर्षे घाऊक मासे विक्री होत असल्याने तेथे ग्राहक येतात. बायणा मासे मार्केटात स्थलांतर केले, तर ग्राहक तुटण्याची भीती संबंधित मासे विक्रेत्यांना वाटत आहे. त्यामुळे ते विक्रेते तेथे जाण्यास राजी नसल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT