पावसाचा तडाखा 
गोवा

Valpoi Sattari Storm | सत्तरी तालुक्याला वादळी वाऱ्याचा तडाखा

Valpoi Sattari Storm | अनेक घरांवर झाडे कोसळली; वीजवाहिन्यांचे मोठे नुकसान, मदतीचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

वाळपई : पुढारी वृत्तसेवा

सत्तरी तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील विविध भागांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, संध्याकाळी सुटलेल्या जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वीजवाहिन्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक घरांवर झाडे कोसळल्याने लाखो रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली आहे.

आमदार डॉ. देविया राणे यांनी नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यात येईल, असे सांगितले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनीही नुकसानग्रस्त घरांचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत व दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. ब्रह्मकरमळी, खडकी, भेडशीवाडा, भुईपाल, दाबे, हेदोडे, पाडेली, धामसे आणि म्हाऊस या भागांना वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका बसला. अनेक घरांची छपरे उडाली, भिंतींची पडझड झाली, तर घरगुती साहित्याचेही मोठे नुकसान झाले.

वाळपई अग्निशामक दलाने युद्धपातळीवर काम करत रस्त्यांवरील झाडे हटविली आणि घरांवर पडलेली झाडे काढून लाखो रुपयांची मालमत्ता वाचवली. भुईपाल कॉलनी येथील माली बाबू पावणे यांच्या घराचे सर्वाधिक नुकसान झाले. सुमारे १ लाखांचे आर्थिक नुकसान झाले. खडकी शिवाजीनगर येथील बुध हरिजन यांच्या घरावर दुपारी चारच्या सुमारास जंगली झाड कोसळून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.

होंडा पंचायत क्षेत्रातील भेडशीवाडा-भुईपाल येथे धोंडू ताटे यांच्या घरावर शेजारील आंब्याचे झाड कोसळल्याने सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. म्हाऊस पंचायत क्षेत्रातील दाबे येथील संगीता गावस यांच्या घरावर झाड कोसळून सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान झाले. धामसे येथील सातेरी मंदिराजवळ वीजवाहिनीवर झाड पडून तारा तुटल्या, तर कोपार्डे धनगरवाडी रस्त्यावर अकेशियाचे झाड पडल्याने तीन वीजखांब मोडले.

त्यामुळे काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. सहाय्यक अभियंता अरविंद गावडे यांच्या माहितीनुसार, वीज कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून सुमारे चार तासांत वीजपुरवठा पूर्ववत केला.

ब्रह्मकरमळी येथे काजूचे, पाडेली गावकरवाडा येथे फणसाचे, वाळपई-म्हाऊस रस्त्यावरील सानियाबाद तसेच वाळपई-होंडा मार्गावरील रेडीघाट गणपती मंदिराजवळ झाडे कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

अग्निशामक दलाची दिवसभर धावपळ

वाळपई अग्निशामक दलाने दिवसभरात दहा हून अधिक ठिकाणी धाव घेत झाडे हटविण्याची कामे केली. ब्रह्मकरमळी, खडकी, भेडशीवाडा, दाबे, हेदोडे, पाडेली, धामसे आणि म्हाऊस परिसरात तातडीने मदतकार्य राबविण्यात आले

डिचोली तालुक्यात लाखोंची हानी

डिचोली : डिचोली तालुक्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने शनिवारी धुमाकूळ घातल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, वीजवाहिन्यांचे नुकसान झाले आणि घरांसह अन्य मालमत्तेची हानी झाली. या नैसर्गिक आपत्तीत सुमारे चार लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारापूर, पिळगाव, खरपाल, साळ, कुडचिरे, नावेळी, सुर्ला, वेळगे, मये आदी भागांना वादळी पावसाचा मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने काही घरांचे नुकसान झाले, तर एका ठिकाणी गोठ्यावर झाड कोसळल्यानेही हानी झाली. चोडण आणि मये परिसरात वीजवाहिन्यांवर झाडे पडल्याने काही काळ वीजपुरवठा विस्कळीत झाला. तसेच अनेक रस्त्यांवर झाडे कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. डिचोली अग्निशमन दलाचे अधिकारी राहुल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी तातडीने मदतकार्य हाती घेतले. मुसळधार पावसातही त्यांनी रात्री उशिरापर्यंत विविध ठिकाणी पडलेली झाडे हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले केले आणि नागरिकांना दिलासा दिला. व डिचोली बाजारपेठेतील एका इमारतीवरील पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याने भाजीपाला फळविक्रेत्यांचे नुकसान झाले. उडालेली पत्रे दूरवर जाऊन पडल्याने काही नागरिक थोडक्यात बचावले. तसेच बाजारातील फरशीच्या लाद्याही उखडल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT