hedavi river 
गोवा

Valpoi Municipality | वाळपईतील नाले, नदीपात्रांची साफसफाई करा

Valpoi Municipality | ग्रामस्थांची मागणी; पावसाळ्यात जैवविविधतेला धोका पोहोचण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

वाळपई: पुढारी वृत्तसेवा

वाळपई नगरपालिका क्षेत्रातील नाले आणि नदीपात्रांची तातडीने साफसफाई करणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे, अन्यथा पावसाळ्यात नदीपात्रात साचलेली घाण आणि कचरा पाण्याच्या प्रवाहाबरोबर प्रमुख नद्यांमध्ये मिसळून जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाळपई नगरपालिकेच्या प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सध्या वाळपई नगरपालिकेची मुदत संपल्याने प्रशासकीय कारभार सुरू असून, राजू देसाई यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर सत्तरी तालुक्याचे मामलेदार दयानंद बांदोडकर हे मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आगामी काही दिवसांत पावसाळ्याला सुरुवात होणार असल्याने नाले आणि नदीपात्रांची साफसफाई करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.

वाळपई नगरपालिका क्षेत्रातील अनेक नाले आणि नदीपात्रे सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे दिसून येत आहे. अनेक घरांमधील सांडपाणी थेट गटारांमध्ये सोडले जात असून तेथून ते नदीच्या नाल्यांमध्ये मिसळत आहे. परिणामी, नाल्यांमधील पाणी दूषित झाले असून परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

नगरपालिका क्षेत्रातील अनेक नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून विशेषतः प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. हा कचरा वेळेत हटवला नाही, तर पाण्यातील जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर हा कचरा प्रमुख नद्यांमध्ये मिसळून प्रदूषण अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तसेच नाल्यांमध्ये साचलेला कचरा पाण्याबरोबर वाहून जाऊन खालच्या भागातील शेती आणि बागायतीमध्ये पसरण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नगरपालिकेने तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिका नाल्यांची साफसफाई करत असली तरी साफसफाईनंतर गोळा करण्यात आलेला कचरा नदीपात्राच्या कडेला टाकला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्यात हा कचरा पुन्हा पाण्याबरोबर वाहून जात असल्याने नदीप्रदूषणात अधिक भर पडत असल्याचे दिसून येत आहे.

यंदा तरी साफसफाईदरम्यान गोळा होणारा कचरा नदीपात्राबाहेर काढून तो नगरपालिकेच्या कचरा प्रकल्पात टाकावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. नदीपात्रातच कचरा ठेवल्यास साफसफाईचा कोणताही उपयोग होत नसून उलट नदी आणखी प्रदूषित होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः प्रमुख रस्ते आणि पुलांच्या परिसरात प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणि इतर कचरा मोठ्या प्रमाणात फेकला जात असल्याचे आढळून येत आहे.

दिखाऊपणा नको

पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई करताना केवळ दिखाऊपणा होऊ नये, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे. अनेकदा केवळ नाममात्र साफसफाई केली जाते आणि काम अर्धवट राहते. परिणामी, कचरा पुन्हा पाण्यात मिसळून नदीप्रदूषण वाढते. याचा परिणाम मासे आणि इतर जलजीवांवर होत असून पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT