Utpal Parrikar  
गोवा

Utpal Parrikar Panaji Election 2027 | विधानसभा निवडणूक अपक्षच लढणार

Utpal Parrikar Panaji Election 2027 | उत्पल पर्रीकर यांची स्पष्टोक्ती; काँग्रेसच्या उमेदवारीवर लढणे अशक्य

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आपण नवखा होतो, अपक्ष लढलो, तरी अवघ्या ७१६ मतांनी हरलो. त्यामुळे २०२७ ची विधानसभा निवडणूकही आपण अपक्षच म्हणून लढवणार आहे, अशी माहिती उत्पल पर्रीकर यांनी दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पर्रीकर यांनी भूमिका मांडली.

उत्पल पर्रीकर म्हणाले, मला काहीजण भाजपची उमेदवारी मिळत नाही तर काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवा, असे सांगत आहेत. मात्र, माझे बाबा मनोहर पर्रीकर यांचा वारसा पाहता मी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवू शकत नाही. भारतीय जनता पक्षाने मला २०२२ मध्ये पणजीतून उमेदवारी दिली असती तर मी निश्चितपणे जिंकलो असतो, असे उत्पल पर्रीकर यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.

नगर नियोजन खात्याच्या कलम ३९ ए ला आपलाही विरोध आहे. या कलमामुळे राज्यातील गावागावांतील लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. झोन बदलांमुळे लोकांच्या जमिनी आणि पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना स्थानिक लोकांचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत सामील करून घेणे आवश्यक आहे,

असे पर्रीकर यांनी सांगितले. कॅसिनो व्यावसायिकांची मनमानी सुरू आहे. त्यांच्यावर निर्बंध घालणे गरजेचे आहे. केवळ घोषणा न करता सरकारने कायदेशीर मार्गाने ठोस पावले उचलून नवीन पर्यटन धोरण लागू करावे. जुन्ता हाऊस इमारत पाडून तेथे उभारण्यात येणाऱ्या नव्या इमारतीत नियोजित असलेल्या कॅसिनोलाही आपला विरोध असल्याचे ते म्हणाले.

घातक घराणेशाही असल्याचे सांगून पणजीचे आमदार व महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यावर त्यांनी टीका केली. आपल्या कुटुंबातील सदस्यांना राजकारणात आणून आणि त्यांचा वापर करून सरकारवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

पणजीकर विचार करतील...

महापालिका निवडणुकीत आपल्या पॅनलचे उमेदवार नवखे होते. १५ दिवसही त्यांना प्रचाराला मिळाले नाहीत. तरीही त्यांनी अनुभवी नगरसेवक असलेल्या विरोधी उमेदवारांना चांगली टक्कर दिली. या निवडणुकीत लोकांनी जरी अनुभवी उमेदवारांना निवडले असले, तरी विधानसभा निवडणुकीत वेगळा विचार पणजीकर निश्चित करतील, असा आशावादही त्यांनी वर्तवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT