पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात मराठी साहित्य आणि मराठी पत्रकारितेचा समृद्ध वारसा असून मराठी भाषेच्या जतन व संवर्धनात पत्र-कारितेचे मोठे योगदान आहे. पत्रकार हा समाजातील महत्त्वाचा दुवा असून लोकभावना आणि समाजजीवनाचे वास्तव तो आपल्या लेखणीतून मांडत असतो, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
गोवा मराठी पत्रकार संघाचा स्थापना दिन आणि पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी कला अकादमीच्या कृष्णकक्षात उत्साहात पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठा वर साळगावचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष केदार नाईक, कला अकादमीचे अध्यक्ष बाबू कवळेकर, गोवा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वामन प्रभू, उपाध्यक्ष गुरुदास सावळ आणि सचिव सुभाष नाईक उपस्थित होते.
श्रीपाद नाईक म्हणाले की, त्यांच्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनातील यशात पत्रकारितेचे मोठे योगदान राहिले आहे. लोकसभेत सलग सहा वेळा प्रतिनिधित्व करण्याची संथी मिळाली, त्यामागे जनतेसोबतच माध्य-मांचीही महत्त्वाची भूमिका आहे. पत्रकार समाजातील वास्तव मांडत असला तरी संपादकीय विभागातील उपसंपादकांवरही तितकीच मोठी जबा बदारी असते.
ग्रामीण पत्रकारांसह उप- संपादकांचा गौरव करण्याचा गोवा मराठी पत्रकार संघाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी निर्भीड पत्र कारिता आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी दै. 'पुढारी'चे उपसंपादक दीपक जाधव यांच्यासह सर्व पुरस्कारप्राप्त पत्रकारांचे अभिनंदन केले.
यावेळी केदार नाईक म्हणाले की, पत्रकारांनी सरकारवर अंकुश ठेवण्याची भूमिका पार पाडली पाहिजे. राजकीय व्यक्तींच्या चुका निर्भीडपणे दाखवून देणे हे पत्रकारितेचे कर्तव्य आहे. त्यांचे वडील जयप्रकाश नाईक हे पत्रकार होते आणि त्यांनी नेहमी सत्याची कास धरून पत्रकारिता केली, असे त्यांनी सांगितले.
बाबू कवळेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार विशांत वझे, दीपक जाधव, सुभाष महाले, सूरज प्रभू आणि जयंती संभाजी यांचा विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. पुरस्कारप्राप्तांच्या वतीने जयंती संभाजी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत वामन प्रभू यांनी केले. पाहुण्यांचा परिचय विठ्ठल गावडे-पारवाडकर यांनी करून दिला, तर सूत्रसंचालन नितीन कोरगावकर यांनी केले.
'चांदणं झाली रात'ने रंगत वाढवली
गोवा मराठी पत्रकार संघाच्या स्थापना दिनानिमित्त निषाद क्रिएशन निर्मित 'चांदणं झाली रात' ही मराठी भावसंगीताची सुरेल मैफल सादर करण्यात आली. गायक नवाब शेख आणि अमृता पेडणेकर यांनी विविध भावगीते सादर केली. त्यांना बाळकृष्ण मेस्त, दिगज बेणे, अश्वीन जाधव आणि नितीन कोरगावकर यांनी विविध वाद्यांवर साथ दिली. कार्यक्रमाचे निवेदन शुभदा पाटील यांनी केले.