

धाराशिव येथे सुरू झालेल्या ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात साहित्यविश्व आणि समाजव्यवस्थेवर भाष्य करताना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी साहित्यिकांवरच थेट टीकेची झोड उठवली. “एक काळ असा होता की साहित्यिक वाघासारखे गर्जत होते, पण आज साहित्यिक बिळात जाऊन बसले आहेत. समाजाच्या आजच्या दुर्दशेला साहित्यिकही तितकेच जबाबदार आहेत,” अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली.
धाराशिवमधील ‘लोकनेते अजितदादा पवार साहित्यनगरी’ येथे गुरुवारी या साहित्य संमेलनाचे उत्साहात उद्घाटन झाले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या ‘विचारपेठे’त आणि संतश्रेष्ठ गोरोबाकाका प्रवेशद्वारातून साहित्यप्रेमींनी संमेलनस्थळी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. गोरे यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर साहित्यिकांची भूमिका अधिक ठळक असण्याची गरज व्यक्त केली. “शेतकरी आत्महत्या करत आहे, सामान्य माणूस अनेक संकटांशी झुंजतो आहे, पण साहित्यिक या प्रश्नांवर बोलताना दिसत नाहीत. सत्य मांडण्याची भीती साहित्यिकांमध्ये वाढली आहे. तुम्ही मेलेले आहात की जिवंत, हा प्रश्न साहित्यिकांनी स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे,” असे ते म्हणाले.
त्यांनी साहित्यिकांना संत तुकाराम आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजातील प्रश्नांवर निर्भीडपणे बोलण्याचे आवाहन केले. “आज अनेक साहित्यिक भौतिकवादात अडकले आहेत आणि वास्तवापासून दूर गेले आहेत,” अशी टीकाही त्यांनी केली.
साहित्यिकांसाठी मोठ्या मागण्या
यावेळी डॉ. गोरे यांनी साहित्यिकांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेसंदर्भातही काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. साहित्यिकांना मिळणारी महिन्याची ५ हजार रुपयांची पेन्शन वाढवून किमान ३० हजार रुपये करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच साहित्यिकांसाठी स्वतंत्र ‘साहित्य सहजीवन’ वसाहत उभारून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.
आमदार कैलास पाटील यांचं कौतुक
राजकारणावरही भाष्य करताना डॉ. गोरे यांनी आमदार कैलास घाडगे पाटील यांचं तोंडभरून कौतुक केलं. “आजच्या राजकारणातील कैलास पाटील हे राजहंस आहेत. साहित्यावर प्रेम करणारे आणि सुसंस्कृत राजकारण करणारे लोकप्रतिनिधी प्रत्येक तालुक्यात असतील, तर महाराष्ट्र बदलायला वेळ लागणार नाही,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
पुरस्कार आणि ग्रंथप्रकाशनाचा सोहळा
या संमेलनात ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांना मरणोत्तर ‘साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांची पत्नी कमलताई चंदनशिव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कारामध्ये ५१ हजार रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि शाल यांचा समावेश होता. तसेच, परिवहन विभागात मराठी सक्तीचा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
याशिवाय, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. किशोर टिळेकर यांना ‘संत तुकाराम महाराज साहित्यरत्न’, तर साक्षी जमादार यांना ‘सावित्रीबाई फुले युवा साहित्यरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पत्रकारितेतील योगदानासाठी दत्तात्री भोंगळे, विनोद राऊत आणि गणेश मोरे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
संमेलनात ‘महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार’ या काव्यगौरव ग्रंथासह अनेक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. साहित्यिक, कवी, लेखक आणि रसिकांच्या मोठ्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.