Goa Uguem water supply  pudhari photo
गोवा

Goa Uguem water supply | उगवेत पाणीपुरवठ्याचा बोजवारा

आठ दिवसांत तब्बल सात वेळा जलवाहिनी फुटली; समस्येमुळे ग्रामस्थांचा संताप

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : उगवे येथील माऊली मंदिर परिसरात पाणीपुरवठा करणारी जुनी पाईपलाईन गेल्या आठ दिवसांत तब्बल सात वेळा फुटल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वारंवार पाईप फुटल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असून नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे.

स्थानिकांच्या मते, संबंधित पाईपलाईन अनेक वर्षांपूर्वी टाकण्यात आली असून ती आता पूर्णपणे जीर्ण झाली आहे. शिवाय ही पाईपलाईन रस्त्याच्या मधोमध असल्याने प्रत्येक वेळी गळती किंवा पाईप फुटल्यानंतर रस्ता फोडून दुरुस्ती करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्याचीही मोठ्या प्रमाणात हानी होत असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या तात्पुरत्या दुरुस्त्यांमुळे प्रश्न सुटण्याऐवजी अधिक गंभीर होत असल्याचा आरोप

ग्रामस्थांनी केला आहे. "दर दोन-तीन दिवसांनी पाईप फुटतो, पाणीपुरवठा बंद होतो आणि पुन्हा रस्ता खोदला जातो. हा त्रास आता असह्य झाला आहे, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली. पावसाळ्याच्या तोंडावर परिस्थिती अधिक बिकट होण्या शक्यता असल्याने संबंधित विभागा तातडीने कायमस्वरूपी उपाययोजन करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

अन्यथा आंदोलन करावे लागेल

स्थानिक प्रशासन आणि पाणीपुरवठा खात्याने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

नवीन जलवाहिनी बसवा

जीर्ण झालेली जुनी पाईपलाईन पूर्णपणे बदलून नवीन व दर्जेदार पाईपलाईन टाकावी, जेणेकरून वारंवार होणाऱ्या गळती आणि पाणीटंचाईच्या समस्येतून नागरिकांची कायमची सुटका होईल, अशी जोरदार मागणी उगवे ग्रामस्थांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT