भाजप-मगो, काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युती होणारच

भाजप-मगो, काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युती होणारच
भाजप-मगो, काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युती होणारच
Published on
Updated on

Goa alliance politics

भाजप-मगोमध्ये निवडणुकीपूर्वी कितीही वाद झाले तरी शेवटी या युतीवर शिक्कामोर्तब होणार आहे. कारण केंद्रीय नेतृत्व त्याला अनुकूल आहे. मगोमुळे हिंदू मतांत पडणारी फूट केंद्रीय नेत्यांना टाळायची आहे. तो निर्णय योग्यच आहे. राज्य भाजपात सुदिन किंवा मगोबद्दल प्रेम आहे असे अजिबात नाही. यापूर्वी आपल्या वागण्यातून त्यांनी ते दाखवून दिले आहे. म्हणूनच सुदिन युतीबाबत बोलताना नेहमी केंद्राशी बोलून ठरवू असेच सांगत असतात. नितीन गडकरींशी त्यांचे सख्य आहे. काँग्रेसमध्येही अनेकांना विजय सरदेसाई नकोसे असले तरी त्यांच्याशी युती करण्यावाचून त्यांना पर्याय नाही. कारण पुन्हा तेच. इथे अल्पसंख्याक मतांत फूट टाळायची असते. विजय काँग्रेसमध्ये नसले तरी काँग्रेस नेत्यांपेक्षाही केंद्रातील अनेक नेत्यांशी त्यांचे अधिक जवळचे संबंध आहेत. कर्नाटकातील शपथविधी सोहळ्यात ते दिसून आले. बी. के. हरिप्रसाद यांच्याशीही त्यांनी मनमोकळा संवाद साधला.

.... म्हणे हिटलर प्रेरणा

तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी हिटलर यांच्यापासून मला प्रेरणा मिळते, असे म्हटल्याने गदारोळ माजला आहे. नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका केली आहे. खरे तर असे 'घरगुती' पक्ष असतात त्यांना हिटलरचीच प्रेरणा असते. उघडपणे ते कुणी मान्य करत नाहीत, एवढेच. अर्थात, रेवंथ रेड्डी यांनी असे म्हटल्याने त्याचा संबंध त्यांच्या अभाविप व संघ पार्श्वभूमीशी जोडला जाणार हे नक्की आहे.

धास्ती रिपोर्टकार्डची

भाजपमध्ये इलेक्शन फिव्हर चढू लागला आहे. पक्षात वेगवान हालचाली होत आहेत. पाच वर्षे सत्ता आणि इतर कारणांमुळे शेफारलेले अनेक तारे आता जमीं पर येणार आहेत. भाजप या बाबतीत दयामाया दाखवत नाही. आता कोणाचे रिपोर्ट कार्ड कसे आहे हे तिकीट वाटपावेळीच समजणार आहे; मात्र यापूर्वीही प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले आहे की ४० टक्के आमदारांचे तिकीट कापले जाते. सध्याची आमदारसंख्या पाहता तिकीट कपातीचा आकडा १० येतो. गेल्या काही दिवसांत अनेक जणांना पक्षातून टार्गेट करण्यात येत आहे. काही जणांबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे, ते पाहता संबंधितांना काहीसा अंदाज आलेलाही असेल. कदाचित येत्या सहा महिन्यांत चमत्कार झाला तर काही जणांची उमेदवारी कायम राहू शकते

गिरीशमुळे वाढल्या अडचणी

काँग्रेसवाल्यांच्या अडचणी वाढल्या की नाही माहीत नाही. मात्र गिरीश यांच्यामुळे फुटिरांच्या अडचणी नक्कीच वाढल्या आहेत. पूर्वी जेव्हा एखाद्या पक्षात एकापेक्षा अधिक उमेदवार तयार होत तेव्हा त्या पक्षाने तिकीट नाकारल्यास दुसऱ्या पक्षाचा पर्याय उमेदवारांसमोर असे. पैसेवाला उमेदवार कोणत्या ना कोणत्या पक्षाची उमेदवारी घ्यायचाच. सध्या भाजपातील बहुतेक आमदार हे काँग्रेसमधून आलेले आहेत. पक्षाने ४० टक्के तिकिटे कापल्यास अशा फुटिरांना उमेदवारी देणार नाही ही भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी अगोदरच जाहीर केल्याने उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा उमेदवारांना मित्र पक्षातर्फे तिकिटे देता येतील का? आणि मित्रपक्षाने फुटिरांना तिकिटे दिल्यास काँग्रेसची काय भूमिका असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

भाजप नेते करतात आंदोलने 'मिस'

गेली जवळपास १५ वर्षे भाजप गोव्यात सत्तेत आहे. त्यामुळे पक्षाला आंदोलन करण्याची काही संधीच मिळालेली नाही. विरोधात असताना मनोहर पर्रीकर कशी आंदोलने करायचे याच्या सुरस कथा भाजपच नव्हे तर काँग्रेसवालेही सांगतात. आदर्श विरोधी पक्ष नेता कसा असावा तर पर्रीकर यांच्यासारखा. पर्रीकरांचे सगळेच हटके. एरवी मुख्यमंत्री कसा असावा अशी चर्चा होत असते. अलीकडेच माजी आमदार, माजी मंत्री विनय तेंडुलकर यांनी एका कार्यक्रमात आम्ही पूर्वी महागाई वाढली की कशी आंदोलने करायचो हे सांगितले. आता आमचेच सरकार असल्याने आंदोलने करता येत नाहीत, असे दुःखही त्यांनी व्यक्त केले. त्यांच्यासारखे दुःख भाजपात अनेकांना होत असणार. भाजप केवळ विकासाच्या गोष्टी करत नाही. पूर्वीची आंदोलनेही नेते-कार्यकर्ते 'मिस' करतात, हे या निमित्ताने समोर आले.

पाऊसकरांचे मिशन फॉरवर्ड

माजी मंत्री दीपक पाऊसकर गोवा फॉरवर्डच्या उमेदवारीवर सावर्डेतून निवडणूक लढवतील हे जवळपास स्पष्ट आहे. सावर्डे मतदारसंघातील मिराबाग बंधाऱ्याच्या आंदोलनात त्यांनी बराच रस घेतला होता. त्यानंतर बराच वादही झाला होता. २०२२ मध्ये भाजपने तिकीट नाकारल्यावर ते अपक्ष लढून पराभूत झाले होते. २०१७ मध्ये ते मगोच्या उमेदवारीवर निवडून आले होते. मात्र नंतर त्यांनी बाबू आजगावकर यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता गोवा फॉरवर्डच्या उमेदवारीवर दीपक पाऊसकर नशीब आजमावणार आहेत.

विजय सरदेसाई यांना मानाचा पाट

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांच्या शपथविधी सोहळ्याला 'गोवा फॉरवर्ड'चे प्रमुख विजय सरदेसाई यांची उपस्थिती स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. याचे कारण शोधणे कठीण नाही. या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमाला गोव्यातील काँग्रेसचे कुणीच नेते उपस्थित नव्हते, त्यामुळे बंगळुरूमध्ये विजय यांची उपस्थिती अधिकच लक्षणीय ठरली. विशेषतः शपथविधी

एसटींना आरक्षण मिळणार !

गेली अनेक वर्षे राज्यातील आदिवासी (एसटी) समाज आपल्याला राजकीय आरक्षण मिळावे, अशी मागणी करत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार हे आरक्षण मिळावे, असे ते सांगत होते. मात्र, त्यावेळी कोणीही या आरक्षणाला विरोध केला नव्हता. आता आरक्षण मिळण्याची वेळ आल्यावर काही समाज संघटना पुढे येऊन या आरक्षणाला विरोध करत आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांचे शिष्टमंडळ नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आले आणि त्यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी एसटी आरक्षण देण्यास सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे कोणी कितीही विरोध केला, तरी एसींना आरक्षण मिळणारच असे दिसते.

भाजपचे ३० जागांचे लक्ष्य

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून गोव्यात ३० जागा जिंकण्याचे लक्ष्य असल्याचे सांगितले आहे. भाजपला सासष्टी तालुक्यांमध्ये संधी कमी असते. मात्र, यावेळी मडगाव भाजपला मिळण्याची शक्यता आहे, कारण दिगंबर कामत हे भाजपमध्येच आलेले आहेत. त्याचबरोबर नावेलीतून उल्हास तुयेकरही जागा राखू शकतात. फातोर्डातही यंदा विजय विरुद्ध दामू यांच्यात मुकाबला होईल. सासष्टी वगळता इतर तालुक्यात भाजपला संधी दिसते. विरोधक एकत्र आले व एकास एक लढत झाली, तर मात्र ३० जागांचे स्वप्न अधुरे वाटते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news