Goa News Pudhari
गोवा

Lodha One Goa Project | लोढा कंपनीच्या 'वन गोवा' प्रकल्पासाठी 6 कोटींची खंडणी

Lodha One Goa Project | दोघांना अटक; मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील 'वन गोवा' प्रकल्पाचे काम सुरू ठेवण्यासाठी तब्बल ६ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सिद्धेश जाना तारी आणि प्रितेश साळगावकर या दोघांना मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने दोडामार्ग येथून अटक केली. दोन्ही आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपींनी कंपनीकडून आतापर्यंत ४१ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.

गोवा येथील 'वन गोवा' हा प्रकल्प 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा लिमिटेड' कंपनीकडून विकसित केला जात आहे. या प्रकल्पाच्या कामात अडथळे निर्माण करून ते बंद पाडण्याची धमकी देत आरोपींनी कंपनीकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. कंपनीचे कार्यालय लोअर परळ परिसरात असल्याने या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात २७ ऑगस्ट रोजी कंपनीचे अधिकारी श्रेयस रमेश पाटील (३९) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपवण्यात आला.

प्रकल्पाचे काम बंद पाडण्याची धमकी

तक्रारानुसार, ऑगस्ट २०२५ पासून सिद्धेश जाना तारी आणि प्रितेश साळगावकर हे 'वन गोवा' प्रकल्पाच्या कामात अडथळे निर्माण करीत होते. प्रकल्पाचे काम बंद पाडण्याची तसेच आंदोलन करण्याची धमकी देऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. कंपनीकडून प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या असल्याचे सांगूनही आरोपींकडून कामाला विरोध करण्यात आला. काम सुरू ठेवायचे असल्यास पैसे द्यावे लागतील; अन्यथा प्रकल्पाचे काम बंद पाडू, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

काही रक्कम देण्यात आल्याचा दावा

आरोपींनी कंपनीकडे एकूण ६ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. दोन्ही आरोपींनी प्रत्येकी तीन कोटी रुपयांची मागणी केली होती. प्रकल्पाचे काम सुरळीत सुरू राहावे आणि वाद टळावा, यासााठी कंपनीकडून आरोपींना काही रक्कम देण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानुसार सिद्धेश जाना तारी याला ३४ लाख रुपये, तर प्रितेश साळगावकर याला ७ लाख रुपये, अशी एकूण ४१ लाख रुपयांची रक्कम दिल्याचे पोलिसांना सांगण्यात आले.

पैसे दिल्यानंतरही मागणी सुरूच

४१ लाख रुपये दिल्यानंतरही आरोपींकडून पैशांची मागणी सुरूच राहिल्याचा आरोप आहे. १२ ऑगस्ट २०२६ रोजी प्रितेश साळगावकर याने कंपनीच्या अधिकाऱ्यांशी व्हॉट्सॲपवरून संपर्क साधून पुन्हा पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास 'वन गोवा' प्रकल्पाचे काम होऊ देणार नाही आणि आंदोलन करून काम बंद पाडू, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणातील संभाषण तसेच अन्य उपलब्ध पुरावे पोलिसांकडे देण्यात आल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT