पणजी : पुढारी वृत्तसेवा
'ट्रॅव्हल एजंटस् हे गोव्याच्या पर्यटन विकासाच्या प्रवासातील आमचे दीर्घकालीन भागीदार आहेत. समुद्रकिनाऱ्यांपलीकडे विविध अनुभवांवर आधारित गुणवत्तापूर्ण पर्यटनाला प्रोत्साहन देताना ट्रॅव्हल ट्रेडसोबतचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते.
स्थानिक समुदायांना लाभ होईल, रोजगार वाढेल आणि पर्यटकांचे समाधान वाढेल अशा संतुलित पर्यटन विकासावर आमचा भर आहे, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी केले. गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी), गोवा सरकार, यांनी ट्रॅव्हल एजंटस् मीट २०२६ आयोजित केली.
या बैठकीत ट्रॅव्हल आणि पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाचे घटक एकत्र आले आणि गोव्याला विविध अनुभवांनी समृद्ध पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य वाढवणे आणि धोरणे ठरवणे यावर भर देण्यात आला.
या कार्यक्रमात मंत्री रोहन खंवटे, जीटीडीसीचे अध्यक्ष केदार नाईक, व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर, जीटीडीसीचे महाव्यवस्थापक गॅविन डायस, सचिन गोरे, लक्ष्मीकांत वायंगणकर, कपिल पैंगीणकर आणि उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात ५५ ट्रॅव्हल एजंटस्, ओटीए आणि एनटीएस ऑपरेटर्स तसेच गोव्याच्या ट्रॅव्हल ट्रेडमधील इतर भागधारक सहभागी झाले.