

वास्को : पुढारी वृत्तसेवा
येथे वास्को कार्निव्हल समितीने आयोजित कार्निव्हल मिरवणुकीत सामाजिक व पर्यावरणविषयक संदेश देणारे चित्ररथ नागरिकांचे आकर्षण ठरले. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या चित्ररथ व व्यक्तिगतरित्या सहभागी झालेल्यांची संख्या ५६ होती.
त्यामध्ये पारंपारिक ७ पथके, क्लब १८ पथके, फॅमिली ४, जंक कार ७, पुरस्कृर्त ४, जोकर १५ यांचा समावेश होता. पंचायत मंत्री मॉवीन गुदिन्हो यांनी आमदार कृष्णा साळकर यांच्या उपस्थितीत हुतात्मा चौकात मिरवणुकीला झेंडा दाखविल्यावर मिरवणुकीला आरंभ झाला. याप्रसंगी वास्को कार्निव्हल समितीचे अध्यक्ष आग्नेलो नुनीस, राफ त्रिनिदाद तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
स्वातंत्र्यपथावरून निघालेली मिरवणुक जोशी चौकात आल्यावर पथकांनी कला सादर केली. यामध्ये सायबर सुरक्षा, प्लास्टिकचा वापर टाळा, संस्कृतीचे जपणुक करा, पर्यावरणाचे व वनप्राण्यांचे संवर्धन करा तसेच इतर सामाजिक जागृतीचे संदेश देणारे चित्ररथ नागरिकांना भावले. या मिरवणुकीत भारतीय नौदलाचाही चित्ररथ सहभागी झाला होता. ऑपरेशन सिंदूरवर आधारित चित्ररथ सर्वाचे लक्ष वेधून घेत होता.