Tiger killed by wild dogs 
गोवा

Tiger killed by wild dogs- त्या वाघाचा मृत्यू रानकुत्र्यांच्या हल्ल्यामुळे ?

वन अधिकाऱ्याच्या अंदाजानंतर वनमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केली शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पणजी :साकोर्डा जंगलात सापडलेल्या वाघाचा मृत्यू रानकुत्र्यांच्या हल्ल्यात झाला असण्याची शक्यता आहे. सहायक वन संरक्षक परेश परब यांनी तशी शक्यता वर्तविली आहे. मात्र, अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण अधिकृतपणे सांगता येईल, असे वनमंत्री विश्वजित राणे यांनी एका खासगी वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

कर्नाटकातील काळी अभयारण्यातून वाघ ये जा करीत असल्याचा मुद्दाही राणे यांनी मांडला. मात्र, व्याघ्र प्रकल्प, वाघांचा गोव्यातील अधिवास याबाबत राणे यांनी प्रकरण न्यायालयात असल्याने बोलण्याचे टाळले दरम्यान, मृत्यूचे कारण शोधण्यासाठी वन खात्याकडून सांगाडा मिळालेल्या ठिकाणी वाघाच्या अवयवांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा परिसर बंदिस्त करून प्रतिबंधित करण्यात आला असून डीएनए आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात, २ मे रोजी या जंगलात वाघाचा सांगाडा सापडला होता. यात चामड्यासह २३ दात आणि १६ नखे आढळली आहेत. नखांची लांबी ४ सेंटीमीटर आणि शेपटीची लांबी ८२ सेंटीमीटर असल्याने हा वाघ प्रौढ असल्याचे स्पष्ट होते. इतर अवयव कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत्यूचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी रॅपिड अँटिजेन आणि एव्हियन इन्फ्लूएंझा चाचण्या करण्यात आल्या असून डीएनए आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी नमुने डेहराडून येथे पाठवले आहेत. आणखी अवयव सापडल्यास त्यांचा पंचनामा करून तेही तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.

वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सांगाडा सापडलेल्या परिसराची तपासणी केली. या परिसरात कोणतेही सापळे, तारा किंवा बंदुकीच्या गोळ्या आढळल्या नाहीत. तसेच, सांगाड्यातील उपलब्ध अवयवांवरही तारा किंवा गोळीबाराच्या कोणत्याही खुणा दिसून आल्या नाहीत. त्यामुळे मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास सुरू आहे.

रानकुत्र्यांची मोडस ऑपरेंडी...

वाघावर हल्ला करण्याचे धाडस एखाद दुसरा रानकुत्रा करू शकत नाहीत. १० ते २० जणांचा कळप असेल आणि वाघ एकटा किंवा अशक्त, आजारी असेल, तरच रानकुत्रे त्याच्यावर हल्ला करू शकतात. वाघाची पिल्ले ही सुद्धा त्यांची शिकार बनतात. अर्थात, याबाबतची वस्तुस्थिती समितीला तपासावी लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT