तेजोमय प्रकाशपर्व आजपासून Pudhari File Photo
गोवा

तेजोमय प्रकाशपर्व आजपासून

आज नरक चतुर्दशी अन् अभ्यंगस्नान; दिवाळीचा मुख्य दिवस

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणत्यांची रांग, रांगोळीचा गालिचा, अंगणात झुलणारा आकाशकंदील, उजळलेला आसमंत, तेल-उटण्याचा मंद सुवास, फराळाचा आस्वाद, कौटुंबिक स्नेहाचा ओलावा अशा मांगल्याच्या पावलांनी आणि लक्ष लक्ष दिव्यांच्या रोषणाईने आजपासून दीपोत्सवाचे तेजोपर्व सुरू होणार आहे. अंधारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय अशा दिवाळीचा मुख्य दिवस नरक चतुर्दशी गुरुवारी आहे. दिव्यांची आरास आणि आकाशकंदिलांच्या झगमगाटाचा दीपोत्सव पुढील चार दिवस साजरा केला जाणार आहे. गुरुवारी अभ्यंगस्नानाने दिवाळीचा आनंद दरवळणार आहे.

घराघरांतील लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत दिवाळी सणाच्या आनंदाचे तरंग उमटले आहेत. लहान मुलांमध्ये नवीन कपड्यांची नवलाई असून, महिलांनी दिवाळीच्या पहाटे रांगोळी, सडा, दिव्यांची आरास करण्याची तयारी दिवाळीच्या पूर्वसंध्येला केली. दरम्यान, दिवाळीनिमित्त संपूर्ण शहर आकाशदिवे, पणत्यांच्या रोषणाईने उजळून गेले आहे. दिवाळीची पहाट मंगलमय आणि चैतन्यदायी करण्यासाठी घराघरांत उत्साहाला उधाण आले आहे. दिवाळीतील धार्मिक विधींसाठी पूजा साहित्य, फुले, बेंडबत्तासे, कुबेर-लक्ष्मी फोटो खरेदीला बुधवारी रात्री उशिरापर्यंत गर्दी झाली होती. यावर्षी दिवाळीचा सण सहा दिवस साजरा केला जाणार आहे. सोमवार, 28 रोजी वसुबारसने दीपोत्सवाची नांदी झाली असून, धनत्रयोदशीनिमित्ताने 29 रोजी कलशपूजन करण्यात आले. दिवाळीचा मुख्य दिवस नरक चतुर्दशी गुरुवारी, 31 रोजी साजरी केली जाणार आहे. दिवाळी म्हणजे अभ्यंगस्नान हे समीकरण असल्याने गुरुवारी पहाटे घराघरांत अभ्यंगस्नान केले जाईल.

शनिवारी बलिप्रतिपदा पाडवा, तर रविवारी भाऊबीज

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दिवाळी पाडवा शनिवारी साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने व्यापार्‍यांचे वहीपूजन होणार आहे. सकाळी 8.7 मिनिटांपासून ते 9.32 पर्यंत, दुपारी 1.47 मिनिटांपासून 4.37 मिनिटांपर्यंत, सायंकाळी 6.03 मिनिटांपासून 7.37 मिनिटांपर्यंत, तर रात्री 9.12 मिनिटांपासून 12.22 मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त आहे.

उद्या लक्ष्मीपूजन

दिवाळी सणातील एक महत्त्वाचा सोहळा म्हणजे कुबेर-लक्ष्मीपूजन. शुक्रवारी लक्ष्मीपूजन केले जाणार आहे. सायंकाळी 6.04 मिनिटांपासून रात्री 8.35 पर्यंत तसेच रात्री 9.12 मिनिटांपासून 10.47 मिनिटांपर्यंत आणि उत्तर रात्री 12.22 मिनिटांपासून 3.32 मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजनासाठी शुभवेळ आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT