दीपावली : प्रकाशाची पेरणी करणारा उत्सव

दीपावली :  प्रकाशाची पेरणी करणारा उत्सव
Published on
Updated on

आज दीपावली ! नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नानाने दिवाळीची सुरुवात होते. आश्विन अमावस्येचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. यावेळी लक्ष्मी, विष्णू , कुबेर आदी देवतांची पूजा केली जाते.

नरक चतुर्दशी

दीपावली उत्सवातील आजचा (सोमवार) दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. सर्वसाधारणपणे लोक या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करतात. याला मांगलिक स्नानही म्हटले जाते. अंगाला तेल, उटणे आणि अत्तर लावून गरम पाण्याने स्नान केले जाते. अभ्यंगस्नानाच्या प्रथेत आरोग्याची वृद्धी हा महत्त्वाचा घटक आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा अनेक वनस्पतींचा समावेश सुगंधी उटण्यात असतो. स्नान करतेवेळी आघाडा किंवा अपामार्ग वनस्पतीने अंगावर पाणी शिंपडावे म्हणजे प्रोक्षण करावे, असा उल्लेख मिळतो. ही औषधी वनस्पती असून ती देवीला आवडते, असे मानले जाते. एकंदर देवतांच्या पत्रपूजेत आघाड्याचा समावेश असतो. स्नानानंतर यमदेवतेला नमस्कार करून जलांजली वाहायची असते. संध्याकाळी पुन्हा दीपदान केले जाते आणि काही ठिकाणी पितृतर्पणदेखील केले जाते. नरक चतुर्दशी साजरी करण्यामध्ये प्रादेशिक विविधता खूप आढळते. सकाळी स्नानानंतर चिराटं किंवा कारीट नावाचे एक कडू फळ नरकासुराचे प्रतीक म्हणून चिरडले जाते; परंतु यातही भौगोलिक भिन्नतेनुसार जी वनस्पती उपलब्ध असते, तिचा वापर केलेला दिसतो.

नरक चतुर्दशीबाबत लोकप्रिय पौराणिक कथा आहे ती नरकासुर वधाची. नरकासुर हा प्रागज्योनिषपुराचा राजा होता. त्याला पृथ्वीदेवतेकडून वैष्णवास्त्र मिळाले. त्यामुळे तो उन्मत्त झाला. माणसं, देवादिक अशा सार्‍यांना पिडा देऊ लागला. राजांना, त्यांच्या मुलींना कारागृहात डांबून ठेवू लागला. अशावेळी इंद्राने श्रीकृष्णाची प्रार्थना केली. मग श्रीकृष्णाने नरकासुरावर आक्रमण करून त्याचा वध केला. मरतेवेळी नरकासुराने आपल्या नावाची आठवण पृथ्वीवर राहावी म्हणून श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल, त्याला नरकाची पीडा होऊ नये. त्यामुळे तो दिवस नरक चतुर्दशी म्हणून रूढ झाला. मराठी कीर्तन परंपरेत हे प्रसिद्ध आख्यान आजही सादर केले जाते.

भारताच्या अन्य भागांत नरक चतुर्दशीच्या दिवसाला काली चौदस, रूप चौदस, छोटी दिवाली, नरक निवारण चतुर्दशी किंवा भूत चतुर्दशी या नावांनी संबोधिले जाते. तेल, फुले आणि चंदन यांचा वापर करून देवपूजा केली जाते. हनुमानाला नारळ अर्पण केला जातो आणि तीळ, गूळ आणि पोहे यांचा प्रसाद दिला जातो. पिकांच्या संपन्नतेचा काळ या मुख्य रूपातच दिवाळी हा सण साजरा होत असल्याचे दिसते. पश्चिम भारतात ताज्या पोह्यांचे पदार्थ विशेषतः बनवले जातात. तंत्रशास्त्राची उपासना करणारे साधक या दिवशी त्यांचा मंत्र शिकतात किंवा ग्रहण करतात.

आपल्यापासून संकटे दूर राहावीत म्हणून कुलदेवीला स्थानिक परंपरेनुसार नैवेद्य दाखविला जातो. या दिवशीच्या सकाळी सग्यासोयर्‍यांसह दिवाळीच्या खास पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. पश्चिम बंगालमध्ये कालीपूजेच्या आधीचा हा दिवस भूत चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो. बंगाली सांस्कृतिक परंपरेत कालीदेवतेस महत्त्वाचे स्थान आहे. मृत आणि जिवंत जीवमात्रांच्या जगांमधील आवरण खूप झिरझिरीत असते आणि या दिवशीच्या संध्याकाळी पितरं आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी येतात, असे चिंतन या निमित्ताने मांडले गेलेले आढळते. आपल्या मागच्या चौदा पिढ्यांमधील पूर्वज यावेळी येतात. त्यांच्यासाठी चौदा दिवे घराभोवती मांडले जातात. घराच्या आतील आणि बाहेरील प्रत्येक अंधारा कोपरा उजळला जातो. विशेष चौदा दिव्यांमुळे आपल्या पितरांना घराकडे यायला मार्ग कळतो, अशी श्रद्धा आहे.

काली या प्रतीकात अनंततत्त्वाचा अर्थ दडला आहे. पार्वतीच्या सौम्य रूपाचा दुसरा आविष्कार म्हणजे काली. 'काल' म्हणजे 'समय' त्याचं स्त्रीरूप आहे काली. दिवाळीच्या आनंदोत्सवाच्या वेळी विविध प्रसंगी पितरांचं जे स्मरण होते, त्याचे कारण जाणणं महत्त्वाचं आहे. निसगार्र्तही काली व्यापून असते. जी पानगळ सुरू होते, अस्तित्व संपणं असतं, त्यात अबोल खिन्नता असते. त्यात अपरिहार्यतेला शरण जाण्याचा भाव असतो; पण सृजनाची, नव्या अंकुरांची एक दूरवरची आशाही तिथंच दडलेली असते. कालीची संहारक शक्ती स्नेहानं परिपूर्ण असते. 'काली' एक अनुभव म्हणून समोर उभी ठाकते, तेव्हा माणसाचा बौद्धिक यशाचा अहंकार गळून पडतो. आपल्याला प्रत्येकाला आयुष्यात कुठेतरी पोहोचायची ऊर्मी असते; पण म्हणजे जायचं तरी कुठे असतं? कर्मफलांचा होम प्रत्येकाला पूर्ण करावाच लागतो. आयुष्यातला प्रत्येक क्षणही संपतो, मागे पडतो. ही आहे काली! दीपावलीच्या उत्सवात माणसाच्या आनंदाचे प्रकटीकरण आहे; पण त्याचवेळी गतकाळाचे भान आहे. कृतज्ञता आहे. जिवंत आणि गत जग आणि निसर्गातून मिळालेली धान्यलक्ष्मी यांचे खूप सुंदर संतुलन दिवाळीच्या प्रत्येक दिवसाच्या प्रथेतून साधलेले दिसते.

 लक्ष्मीपूजन

आश्विन अमावस्येचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन दिवस. या दिवशी मंगल स्नानाने सुरुवात होते. सकाळी देवांची पूजा, दुपारी पार्वणश्राद्ध आणि संध्याकाळी लक्ष्मी, विष्णू तसेच कुबेर आदी देवतांची पूजा असा क्रम धर्मग्रंथात सांगितलेला आढळतो. प्राचीन काळी बळी नावाच्या पराक्रमी राजाने पृथ्वी तर जिंकलीच; पण लक्ष्मीसारख्या अनेक देवतांना बंदिवासात टाकले. विष्णूने त्या सर्वांना मुक्त केले. मुक्त झालेले देव नंतर शांतपणे क्षीरसागरात जाऊन झोपी गेले, अशी कथा आढळते. या सर्व देवतांसाठी पूजेची व्यवस्था आणि सर्वत्र प्रसन्न पणत्यांचा उजेड केला जातो. पार्वणश्राद्ध म्हणजे श्राद्धाचा एक प्रकार असतो. पित्रादि त्रयीला उद्देशून व तीन पिंडांनी युक्त असे हे श्राद्ध केले जाते. प्राचीन ग्रंथांमध्ये लक्ष्मीपूजन कसे करावे, याचे मार्गदर्शन आढळते. एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदलांचे कमल चिन्ह किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवतात. तिच्यासाठी असा मंत्र म्हणतात,
नमस्ते सर्वदेवांना वरदासि हरे : प्रिया ।
या गतीरुवत्प्रपन्नांना सा मे स्यायत्व दर्शनाम ॥
याचा अर्थ असा की (हे लक्ष्मी) तू सर्व देवांना वर देणारी आहेस आणि विष्णूला प्रिय आहेस. तुला जे शरण येतात त्यांना जी गती प्राप्त होते, ती गती मला तुझ्या दर्शनाने प्राप्त होवो. नंतर या लक्ष्मीजवळ निधी व पद्म यांचा अधिपती असलेल्या कुबेराची प्रतिमा ठेवतात. त्याची पूजा केली जाते. धन व धान्य यांची प्राप्ती व्हावी म्हणून कुबेराकडे प्रार्थना केली जाते. लक्ष्मीसह सर्व देवतांना सुगंधी दुधाचा व खव्याचा नैवेद्य दाखवितात. साळीच्या लाह्या व बत्तासे अर्पण करून मग सर्वांना वाटतात. हातात चूड धरून पितरांना मार्गदर्शन केले जाते. पुराण साहित्यात असे वर्णन आहे की, या रात्री लक्ष्मी सर्वत्र फिरत असते आणि स्वत:च्या निवासासाठी योग्य स्थान शोधत असते. जी वास्तू स्वच्छ, टापटीप, प्रसन्न राखलेली असते, तिथे ती राहते. त्यामुळे या रात्री जागरण करतात. मध्यरात्र झाल्यानंतर अलक्ष्मीला प्रतीकात्मक रूपाने हाकलून लावतात. अलक्ष्मी या देवतेची संकल्पना निराळीच आहे. देव आणि आसुर यांनी समुद्रमंथन केले. त्यावेळी विषानंतरही लक्ष्मीच्या आधी अलक्ष्मी वरती आली. म्हणून ती झाली लक्ष्मीची मोठी बहीण ज्येष्ठा ! अलक्ष्मीने पाण्यातून वर आल्यावर देवांना विचारले, मी काय करू? कुठे राहू? देवांनी तिला सांगितले, तू कोळसा, केस, केर, अस्थी याठिकाणी राहा. जिथे भांडणतंटा, दुष्ट कामे, अनीतिमान व्यवहार चालतो तिथे राहा. अलक्ष्मीच्या रथावर जो ध्वज असतो, त्यावर कावळा असतो. प्राचीन तमीळ निघंटू ग्रंथात तिचे वाहन गाढव व केरसुणी हे आयुध सांगितले आहे. याच ग्रंथात ज्येष्ठा देवीला शीतला म्हटले आहे. अमावस्येच्या दिवशी तिचे निवारण कसे केले जाई ? तर शेणापासून तिची लहान मूर्ती बनवत. मंत्रासह तिची पूजा होई. मध्यरात्रीनंतर सूप व दिमडी वाजवत तिचे गावाच्या सीमेबाहेर विसर्जन केले जाई. पश्चिम बंगालमध्ये या प्रतिमेला 'क्षणिका अलक्ष्मी' असे म्हणतात.

आता या दिवशीची मुख्य देवता असलेल्या लक्ष्मीबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. लक्ष्मी ही विष्णूची केवळ पत्नी नाही तर त्याची शोभा, कांती व तेज आहे. 'लक्ष्म' म्हणजे 'चिन्ह' या शब्दावरून 'लक्ष्मी' शब्द बनला. लक्ष्मीचे चिन्ह कोणते, याबद्दल प्राचीन काळातील निश्चित माहिती मिळत नाही; परंतु 'श्री' हा शब्द 'लक्ष्मी' शब्दाचा पर्याय आहे. 'श्री' हे अक्षर स्वस्तिक चिन्हापासून बनले. त्यामुळे लक्ष्मीचे चिन्ह स्वस्तिक असावे, असे मानले जाते. श्रीसूक्ताने लक्ष्मीची उपासना केली जाते. अगदी प्राचीन काळात श्री व लक्ष्मी या दोन वेगळ्या देवता होत्या. तेज आणि ऐश्वर्याची राज्ञी असलेल्या 'लक्ष्मी' संकल्पनेच्या उत्क्रांतीचा इतिहास मोठा रंजक आहे. कमल पुष्प, गज, सुवर्ण आणि बेलफळ या गोष्टी तिच्याशी निगडित असतात. उपनिषदांच्या काळात बिल्वफल म्हणजे बेलफळाला श्रीफळ म्हटले आहे. लक्ष्मीची आठ रूपे आहेत. ती म्हणजे धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कीर्तिलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि राजलक्ष्मी.

प्राचीन शिल्पकलेत गजलक्ष्मीच्या देखण्या मूर्ती आढळतात. पद्मावस्थेत म्हणजे कमळावर बसलेली, पद्मग्रह म्हणजे कमळ हातात घेतलेली आणि पद्मवत्स म्हणजे कमळांनी वेढलेली अशा लक्ष्मीमूर्तीचे वर्णन आढळते. गुप्तकाळात पुराणसाहित्याला उठाव आला आणि या काळात लक्ष्मीच्या पूजेला विलक्षण महत्त्व आहे. गुप्त सम्राटांच्या शिक्क्यावर लक्ष्मीची मूर्ती ठसवली गेली.

'लक्ष्मी'चे दोन भावात्मक पुत्रही मानले जातात. त्यांची नावे बल आणि उन्माद होय. मात्र, महाभारतातील शांतीपर्वातील एक संदर्भ महत्त्वाचा आहे. आपले निवासस्थान कुठे असते, हे सांगताना लक्ष्मी देवता म्हणते, 'मी प्रयत्नरत राहते. मी उद्योगरूपी आहे. समृद्ध आहे. शांती, प्रेम, दया, सलोखा, न्याय, नीती जिथे असतात, तिथे मी आनंदाने राहते. आपल्याला व्यक्तिगत संपन्नतेसह निसर्गलक्ष्मीही जपायचं व्रत घ्यायला हवं. कारण, निसर्ग समृद्ध तर देशही समृद्ध !

– डॉ. सुरूची पांडे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news