पणजी : पुढारी वृत्तसेवा
उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात (आजिलो) राज्यातील शासकीय रुग्णालयात प्रथमच एआयच्या साहाय्याने टोटल नी रिप्लेसमेंट (गुडघा रोपण) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा मुंज, डॉ. विकास सोलेकर, डॉ. प्रभाव देसाई, डॉ. दिव्या पै आणि संपूर्ण ऑपरेशन थिएटर टीमने मोलाची भूमिका बजावली.
परवडणारी, सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित आरोग्यसेवा देण्याच्या दिशेने राज्याने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी 'एक्स'वरून दिली.
मंत्री राणे यांनी असे नमूद केले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन गोव्याने आधुनिक आरोग्यसेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. सरकारी रुग्णालयात एआयच्या साहाय्याने गुडघा रोपण शस्त्रक्रिया यशस्वी होणे हा राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा आहे.
ही कामगिरी करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे त्यांनी अभिनंदन केले.
राज्य सरकारने अत्याधुनिक उपक्रमांतर्गत डिजिटल माध्यमातून एक लाखांहून अधिक छातीच्या 'एक्स-रे'ची तपासणी केली आहे. यासाठीही एआयचा वापर करण्यात आला. त्यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान वेगाने करणे शक्य झाले. प्रगत स्क्रीनिंग अल्गोरिदमच्या वापरामुळे सार्वजनिक आरोग्य केंद्रांना विविध आजार वेळेत ओळखता आले असून, निदानासाठी लागणारा वेळ निम्म्याहून अधिक कमी झाला आहे.