फोंडा : पुढारी वृत्तसेवा
गोव्यावर जुलमी राजवट केलेल्या पोर्तुगीजांनाही मराठीपुढे शरणागती पत्करावी लागली. गोव्याची मातृभाषा असलेल्या मराठीला सताधाऱ्यांकडून डावलले जाते याला काय म्हणावे, असा प्रश्न प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी उपस्थित केला.
फर्मागुढी-फोंड्यात गोपाळ गणपती सभागृहात मराठी राजभाषा निर्धार समितीच्या फोंडा प्रखंडातर्फे आयोजित युवाशक्ती मेळाव्यात सुभाष वेलिंगकर बोलत होते. यावेळी गो. रा. ढवळीकर तसेच विनायक च्यारी, नितीन फळदेसाई, हनुमंत नाईक, नितीन ढवळीकर आदी उपस्थित होते.
प्रा. सुभाष वेलिंगकर म्हणाले, गोव्यातून मराठी हद्दपार करण्याचे षड्यंत्र पोर्तुगीजांनी रचले होते. मात्र, मराठी प्रेमींचा रेटा पाहून मराठीपुढे त्यांना शरणागती पत्करावी लागली, एवढी मराठीची शक्ती आहे.
युवा शक्ती जेव्हा जागृत होते. तेव्हा भल्या भल्यांना जेरीस आणल्याची अनेक उदाहरणे आहेत. म्हणून युवा शक्तीने आपली ताकद मराठीच्या लढ्यात वापरून मराठीला मानाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे वेलिंगकर म्हणाले.
विनायक च्यारी म्हणाले की, गोवा सरकारातील मंत्री आमदारांना मराठीला राजभाषा करण्याची इच्छाच नाही असा आरोप करून या लोकांना त्यांची योग्य जागा दाखवून देण्याची पाळी आली असल्याचे नमूद करून मराठीसाठी सर्वांनी संघटित काम करूया असे आवाहन केले.
'मराठीचा लढा...' चे प्रकाशन !
मराठी आंदोलनाचे मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर यांच्या मराठीचा लढा सत्यासाठी न्यायासाठी या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. मराठीचा लढा आणि माहिती मराठीप्रेमी आणि युवकांना कळावी यासाठी हे पुस्तक लिहिले असून युवावर्गान मराठीच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन गो. रा. ढवळीकर यांनी केले.
2027 मध्ये धडा शिकवू
मराठीला मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी टाळाटाळ केली तर येत्या 2027 च्या निवडणुकीत सताधाऱ्यांना धडा शिकवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. मराठी ही गोमंतकाची मातृभाषा असून तिला मानाचे स्थान कुणीही नाकारू शकत नाही, असे मराठीप्रेमी म्हणाले.