पणजी : पुढारी वृत्तसेवा
दै. पुढारीने उघडकिस आणलेल्या कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. संशयित नगरसेवक पुत्र सोहम सुशांत नाईक सध्या पोलिस कोठडीत असून त्याचा मोबाईल वेर्णा येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फोरेन्सिक सायंटिफिक लॅबोरेटरी) पाठवण्यात आला आहे.
त्या मोबाईलमधून काढून टाकण्यात आलेले व्हिडिओ तसेच इतर डेटा पुन्हा मिळाल्यानंतर पुढील कारवाईला गती येणार आहे. दरम्यान, संशयिताविरोधात जशा तक्रारी येत आहेत, त्यानुसार स्वतंत्र गुन्हा दाखल त्याचा स्वतंत्र करून अधिकाऱ्यामार्फत तपास सुरू आहे. त्यामुळे गुन्ह्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यासाठी सोहमला न्यायालयात हजर केले जाणार असल्याने त्याच्या जामिनाचा मार्ग तूर्त बंद झाला असल्याने त्याचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढणार आहे.
क्राईम ब्रँचच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातून अजून बरेच काही उघड होणे बाकी आहे. संशयित सोहमच्या मोबाईलमधील डाटा रिकव्हर झाल्यानंतर या प्रकरणातील अनेक धागेदोरे उघड होणार आहेत.
ज्या पीडित तरुणी व त्यांचे पालक माहिती देण्यास पुढे येत नाहीत, त्यांना मोबाईलमधील माहिती उघड झाल्यावर तक्रारीस मदत करावी लागणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
क्राईम ब्रँचकडे तपास सुरू असलेल्या प्रकरणांमध्ये दोन युवती आणि दोन अल्पवयीन मुलींच्या तक्रारींवरून गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. गुन्हा शाखेने संशयिताच्या घराची झडती घेतली असली तरी या प्रकरणात अन्य कोणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या लैगिक अत्याचार प्रकरणात त्याचा कोणी साथीदार आहे का, याचाही शोध पालिसांकडून सुरु आहे.
प्रत्येक प्रकरणाचा तपास अधिकारीही वेगळा...
प्रत्येक पीडितेची तक्रार वेगवेगळी नोंद करून त्यासाठी तपास अधिकारीही वेगळा आहे. त्यामुळे सध्या संशयित सोहम नाईक याची दाखल झालेल्या तक्रारींची चौकशी सुरू असली तरी त्याला एकाच प्रकरणात पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.
त्यामुळे त्याची प्रत्येक प्रकरणासाठी पोलिस कोठडी घेतली जाणार आहे. त्यामुळे त्याला या प्रकरणातून लवकर जामीन मिळण्याची शक्यता मावळली आहे.