

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत १६ प्रभागांतील सर्व ३२ नगरसेवक शिवसेना-भाजप युतीचे असावेत, असे पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वप्न होते. परंतु, युतीचे २९ उमेदवार विजयी झाले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे ३ नगरसेवक निवडून आले. निवडणुका झाल्यानंतरही पालकमंत्र्यांनी युतीच्या ३२ नगरसेवकांचे स्वप्न पाहणे सोडले नव्हते.
त्यानुसार त्यांनी आवश्यक ती रणनीती अवलंबली. त्यामुळे आता शिवसेनेचे २५, तर भाजपचे ७नगरसेवक म्हणजेच युतीचे ३२ नगरसेवक होण्याचा मार्ग प्रगतीपथावर आला आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना-भाजप युती उमेदवारांच्या पाठीमागे आवश्यक ती सर्व ताकद उभी केली.
त्यामुळे त्यांनी युतीचे सर्व उमेदवार निवडून येतील, असे जाहीर केले होते. परंतु, युतीचे २९ उमेदवारच निवडून आले. प्रभाग क्र.४ मधून शिवसेना उबाठा गटाचे केतन शेट्ये, फौजिया मुजावर आणि प्रभाग क्र. १५ मधून अमित विलणकर विजयी झाले.
शिवसेना-भाजप युतीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून यावेत, हे स्वप्न साकारण्यासाठी पालकमंत्र्यांनी निवडणुका झाल्यानंतरही प्रयत्न सोडले नाहीत. आता या प्रयत्नांना लवकरच यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दोन नगरसेवक शिवसेनेकडे आणि एक नगरसेवक भाजपकडे जाण्याची दाट शक्यता आहे. यापैकी १ नगरसेवक हा पूर्वी भाजपात होता, त्यामुळे तो भाजपात जाणार आहे. तसेच शिवसेनेत येणाऱ्या नगरसेवकांसोबत बैठका होत आहेत. दोन्ही बाजूच्या अटीशर्ती परस्परांना मान्य झाल्यानंतरच संपूर्ण रत्नागिरी शहर शिवसेना-भाजप युतीमय होण्याचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर आहे.