Goa Fire Case 
गोवा

Goa Fire Case | गोव्याच्या हरमल बीचवर आगीचे तांडव! 6 रेस्टॉरंट्स जळून खाक; शॉर्टसर्किटमुळे लाखो रुपयांची हानी

Goa Fire Case | हरमल येथे वीज खांबावर शॉर्ट सर्किटमुळे घटना; लाखोंचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

हरमल : पुढारी वृत्तसेवा

खालचावाडा हरमल बीचवर लागलेल्या भीषण आगीत सहा रेस्टॉरंटस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यातील एका रेस्टॉरंटजवळील वीज खांबावर शॉर्टसर्किट झाल्यामुळे हा प्रकार घडला. शनिवारी पहाटे सुमारे ३ च्या सुमारास वीज खांबावरून ठिणग्या उडताना दिसल्याने नागरिकांनी रेस्टॉरंट मालकांना याची माहिती देत त्यांनी मौल्यवान वस्तू बाहेर काढण्यास मदत केली.

मात्र, जोरदार वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली आणि जवळील सहा रेस्टॉरंटसना मोठा फटका बसला, अशी माहिती नागरिक हरेश मयेकर यांनी दिली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्निशमन दलाचे वाहन वाळूत रुतल्याने आग आटोक्यात आणण्यात अडचणी निर्माण झाल्या. दलाचे जवान व पोलिसांनी आग आटोक्यात आणण्याचे कार्य सुरू ठेवले. या कामी नागरिकांनी धाव घेत त्यांना साहाय्य केले. या घटनेचा तपास सुरू आहे. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

घटनेवेळी सर्व रेस्टॉरंट बंद होती. तसेच गॅस सिलिंडर नसल्याने दुर्घटना टळली. आ. आरोलकर यांचीही तत्परता घटनेची माहिती समाजकार्यकर्ते जॉकी रॉड्रिग्ज यांनी आमदार जीत आरोलकर यांना दिली. ते पहाटे घटनास्थळी पोहोचले. त्यांनीही आग आटोक्यात आणण्यास मदत केली. पेडणे अग्निशमन दलाचे अधिकारी नामदेव परवार, त्यांचे सहकारी जवान तसेच मांद्रे पोलिसांनी या कार्यात मोलाचे सहकार्य केले. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

माडांसह घरांची हानी

या आगीत अंदाजे २० मीटर उंचीचे माड जळून खाक झाले, तर आणखी चार माड व इतर झाडांना आगीची झळ बसली. काही जुन्या पक्क्या बांधकामांची दारे, खिडक्या व तावदाने यांचेही मोठे नुकसान झाले.

मडगावात दोन दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

दुसऱ्या घटनेत मडगाव येथील न्यू मार्केट परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही घटना मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT