

हरमल : खालचावाडा बीचवरील एका रेस्टॉरंटजवळील वीज खांबावर शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केल्याने तेथील सहा रेस्टॉरंट आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अग्निशामक दलाचे वाहन वाळूत रुतल्याने आग आटोक्यात आणण्यात अडचणी निर्माण झाल्या. मात्र, स्थानिक नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणली. शनिवार पहाटे सुमारे 3 च्या सुमारास वीज खांबावरून ठिणग्या उडताना दिसल्याने नागरिकांनी रेस्टॉरंट मालकांना याची माहिती दिली. जोरदार वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली आणि येथील सहा रेस्टॉरंटना याची झळ बसली, अशी माहिती नागरिक हरेश मयेकर यांनी दिली. घटनेवेेळी सर्व रेस्टॉरंट बंद होते. तसेच गॅस सिलिंडर नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीत काही माडाची झाडेही खाक झाली.