म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
सहा महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करीत नूतनीकरण करण्यात आलेल्या शिवोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तीव्र तुटवडा जाणवत असून गेल्या तीन महिन्यांपासून येथील रुग्णांची औषधांअभावी मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवोली येथील इंग्रजवाडा परिसरात कार्यरत असलेल्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे अंदाजे ६ कोटी रुपये खर्च करून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी नूतनीकरण तसेच विस्तारीकरण करण्यात आलेल्या येथील केंद्रात आवश्यक उपकरणे तसेच पुरेसा कर्मचारी वर्ग पुरविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते.
दरम्यान, येथील केंद्रात सध्या बाह्यरुग्ण विभाग, आपत्कालीन विभाग, प्रसूती विभाग असे महत्त्वाचे विभाग इतर सामान्य विभागाबरोबरच कार्यरत असून पेडणे तालुक्यातील केरी हरमलपासून ते बार्देशातील गिरी, वेर्ला-काणका तसेच हणजूण-वागातोर आणि शिवोली पंचक्रोशीतील सडये ते ओशेलपर्यंतचे शेकडो ग्रामस्थ, तसेच मजूर रुग्ण येथील केंद्रातील आरोग्य सेवेचा नियमितपणे लाभ घेत असतात.
दुर्दैवाने, गेल्या तीन महिन्यांपासून येथील केंद्रात औषधांचा तीव्र तुटवडा जाणवत असल्याने तपासणीसाठी येत असलेले रुग्ण औषध विभागातील कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसतात.
एकाच ठिकाणी औषधे उपलब्ध करा:
गोवेकर आरोग्य केंद्रात येणाऱ्या नागरिकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना औषधासाठी वणवण करण्याची गरज पडता कामा नये. सरकारने गरजेची सर्व औषधे या ठिकाणी उपलब्ध करण्याची गरज असल्याचे ज्येष्ठ नागरिक एकनाथ गोवेकर यांनी सांगितले. यासाठी औषध विभागातील कर्मचाऱ्यांनी औषधांची वेळीच नोंद करणे आवश्यक आहे.