

पणजी : पुढारी वृत्तसेवा
वास्को येथील मुरगाव पत्तन यंत्रणा (एमपीए) तर्फे रस्त्यावर गेट टाकल्यामुळे तेथे वारंवार अपघात होत आहेत. सदर गेट हटवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत, आदेश देऊन सहा महिने झाले तरी अद्यापही सदर गेट काढले नाही.
सदर जागा अपघात प्रणव झालेली आहे. त्यामुळे सदर गेट त्वरित हटवावे, अशी मागणी भाजपचे वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी केली. शून्य प्रहराला त्यांनी ही मागणी केली. शून्य प्रहराला डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी मूळगाव मंदिराला व गावाला खाण पिठाचा धोका असल्याचे सांगत योग्य ते उपाययोजण्याची मागणी केली, तर आमदार विजय सरदेसाई यांनी दक्षिण गोवा मासे मार्केटमध्ये दुर्गंधी पसरल्याचे सांगून सदर मार्केटची पायाभूत सुविधा विकास महामंडळाद्वारे सुधारणा करण्याची मागणी केली.
शून्य प्रहराला आमदार नीलेश काब्राल यांनी अनेक आस्थापनांमध्ये तारीख संपलेली अग्निशामक उपकरणे असल्याचा मुद्दा उपस्थित केला. कार्यकाळ संपूनही उपकरणे बदलली जात नाहीत आणि आगीच्या घटना घडतात, असे सांगून अग्निशामक दलाने सर्व आस्थापनाच्या मध्ये असलेल्या उपकरणांची तपासणी करावे अशी मागणी केली. याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की याबाबत ऑर्डर काढली जाईल आणि खास धोरणही राबवले जाईल, असे ते म्हणाले.
शहरे प्रदूषित होत आहेत : युरी आलेमाव पणजी व मुरगाव या शहरासह बांबोळी व पर्वरी येथे प्रदूषण वाढले आहे. त्यावर सरकारने आताच उपाययोजना करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी बुधवारी विधानसभेत शून्य प्रहराला केली. वरील जागी १६३ ते १७८ एआयक्यू रेंज असल्याचे ते म्हणाले. त्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून प्रदूषण कमी व्हावे यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आलेमाव यांना दिले.
खाजन शेतीत येणारे पाणी रोखा : बोरकर खाजन शेतीमध्ये खारे पाणी भरल्यामुळे लोकांना शेती करता येत नाही, भाजी उत्पादन घेता येत नाही. त्यामुळे खारे पाणी शेतामध्ये जाण्यावर उपाययोजना करा अशी मागणी आमदार विरेश बोरकर यांनी बधवारी शून्य प्रहराला केली. खारे पाणी शेतात येत असल्यामुळे शेती बुडतात, शेतकऱ्यांची नुकसान होते त्यामुळे खाजण नियमांमध्ये सुधारणा करण्याची मागणीही बोरकर यांनी केली. त्यावर महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांना दिले.