पणजी : पुढारी वृत्तसेवा
तरुणीचा पाठलाग करून पाटो पणजी येथील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये तिच्यावर बळजबरी व विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या पर्यटक संशयित एम. मल्लीकार्जुन (वय ३५, रा. कर्नाटक) याचा मेरशी अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला.
हे प्रकरण तरुणीचा विनयभंग करण्याच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. त्याने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. तो बिगर गोमंतकीय आहे. संशयित न्यायालयीन कोठडीत आहे या एकाच कारणास्तव त्याला जामिनावर मुक्त करणे हा जामीन मंजूर करण्यासाठी पुरेसा आधार ठरू शकत नाही.
महत्वाच्या साक्षीदारांच्या जबानी अजून नोंद झालेल्या नाहीत. त्याला जामीन मिळाल्यास तो साक्षीदरांना आमिष किंवा धमकावण्याची शक्यता आहे. हे प्रकरण खूपच संवेदनशील असून त्याला जामीन मिळाल्यास पीडित महिला निश्चितच मानसिक आघात व भीतीखाली राहील.
अशा परिस्थितीत जर संशयित न्यायालयीन कोठडीत असेल तर पीडिल महिलेला पुन्हा पूर्ववत व निर्भय स्थितीत आणणे शक्य होईल. साक्षीदारही देखील निर्भयपणे आपली जबानी न्यायालयात नोंदवू शकतील, असे निरीक्षण न्यायालयाने संशयिताला जामीन फेटाळताना केले आहे.
२७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.४० वाजण्याच्या सुमारास संशयिताने पीडित तरुणीचा पाठलाग केला. ती पाटो येथील एका इमारतीत ऑफिसमध्ये जाण्यासाठी लिफ्टमध्ये शिरली. तिच्या पाठोपाठ संशयितही लिफ्टमध्ये घुसला. कोणीही लिफ्टमध्ये नसल्याची संधी साधून त्याने तिचा विनयभंग केला होता.