Saptakoteshwar Temple Kotitirth 
गोवा

Saptakoteshwar Temple Kotitirth : पश्चिम किनारपट्टीवरील भारताची काशी!

Saptakoteshwar Temple Kotitirth : दिवाडी येथे कोटीतीर्थ कॉरिडोअर विकास प्रकल्पाचा शुभारंभ; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते महाअभिषेक

पुढारी वृत्तसेवा

डॉ. भूषण भावे


श्री सप्तकोटेश्वर, कोटीतीर्थ जीर्णोद्धारशुक्रवार ४ सप्टेंबर रोजी स. ९ वाजता पोर्णे तीर्थ, दिवाडी येथे कोटीतीर्थ कॉरिडोअर विकास प्रकल्प च्या गोवा सरकारच्या पुरातत्व खात्याच्या प्रकल्पाची सुरुवात म्हणून गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यातर्फे श्री हाटकेश्वर व कोटीतीर्थ येथे महाअभिषेक, उदकशांती व मांडवी पंचगंगा आरती ड. धार्मिक विधी व प्रकट सभेचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त हा खास लेख.

फार प्राचीन काळापासून गोमंतक - गोवा ही पवित्र भूमी, देवभूमी म्हणून ओळखली जाते. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या प्रदेशाला पुराणपरंपरेत 'आनंदकानन' असे संबोधले गेले आहे. सह्याद्रीची बलदंड पर्वतरांग आणि दुसऱ्या बाजूला अथांग हिंद महासागर यांच्या सानिध्यात वसलेली ही भूमी केवळ भौगोलिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण नाही, तर धार्मिक, सांस्कृतिक आणि ज्ञानपरंपरेच्या दृष्टीनेही अत्यंत समृद्ध आहे.

परशुरामभूमीची पुराणपरंपरा

गोव्याच्या प्राचीनतेचा संबंध भगवान परशुरामांशी जोडला जातो. महाक्रोधी परशुराम या भूमीत आल्यानंतर शांताराम झाले, अशी लोकश्रद्धा आहे. दशप्रहरणधारिणी कालीदुर्गा गोमंतकात आल्यानंतर शांतादुर्गा झाली, तर महाभयंकर नृसिंह येथे निराकार स्तंभरूपात स्थापित झाले, अशीही श्रद्धा आहे. भगवान परशुरामांनी समुद्र मागे हटवून ही भूमी निर्माण केली, अशी पुराणकथा प्रसिद्ध आहे.

या कथेमागे समुद्रापासून भूमी निर्माण होण्याची एखादी प्राचीन भौगोलिक वा वैज्ञानिक प्रक्रिया लोकस्मृतीत कथारूपाने जतन झालेली असावी, असे मानता येते. या भूमीची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण लोकपरंपरा म्हणजे समुद्राला घातलेली मर्यादा. भूमी निर्माण केल्यानंतर परशुरामांनी समुद्राला, "तुझ्या पाण्याची मर्यादा या रेषे पलीकडे जाऊ नये," अशी आज्ञा दिली, अशी आख्यायिका आहे. गोव्याच्या समुद्रकिनारी आढळणाऱ्या मारवेल नावाच्या वेलीला काही स्थानिक परंपरांमध्ये या मर्यादावेलीशी जोडले जाते. समुद्रापासूनच ही भूमी निर्माण झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर पूर आल्याची उदाहरणे सापडत नाहीत.

कदंबांचे सुवर्णयुग

गोव्याच्या इतिहासातील सर्वाधिक वैभवाचा कालखंडांपैकी एक म्हणजे कदंब राजवंश. साधारणपणे शके १००८ ते १३०० या कालखंडात कदंबकुलाने गोव्याहून राज्य केले. प्रारंभी चंद्रपूर अर्थात चांदोर आणि नंतर गोपकपट्टण या केंद्रांतून त्यांनी राज्यकारभार केला. कदंबांनी कला, स्थापत्य, प्रशासन, व्यापार आणि संस्कृतीला मोठी चालना दिली.

झांजिबारपासून सुमात्रा पर्यंतच्या विविध राष्ट्रांशी व्यापारी संबंध प्रस्थापित झाल्यामुळे गोमंतक प्रदेश समृद्ध आणि वैभवशाली बनला. कदंब राजांचे श्री सप्तकोटेश्वर हे कुलदैवत व कुलदेवी श्री चामुंडा होती. 'श्री सप्तकोटेश्वरलब्धवरप्रसाद' हे बिरूद ते अभिमानाने धारण करीत. त्यांच्या राजचिन्हात सिंह होते.

गोव्याच्या प्राचीन परंपरेत सिंहाला असलेले महत्त्व लक्षात घेता काही शिलालेख आणि ताम्रपटांत गोव्याचा 'सिंहल' असा उल्लेख आढळतो. याच कालखंडात दिवाडी बेटावरील श्री सप्तनाथ-सप्तकोटेश्वर, श्री गणनाथ आदी मंदिरांचा जीर्णोद्धार झाल्याचे संदर्भ आढळतात.

बाराव्या शतकात कदंबांनी उभारलेले हे भव्य मंदिर पुढे चौदाव्या शतकाच्या मध्याला दख्खनच्या सुलतानाने म्हणजे बहामनी काळात अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूरने उद्ध्वस्त केले. ह्या काळातील इतिहास कोंकण-आख्यानात असा शब्दबद्ध करण्यात आला आहे:
म्लेच्छांनी केला उत्पातदेवांसि अनर्थ आरंDynamicश्री सप्तकोटेश्वर देवासीउपडून चिखली घातिला बांधासीविजयनगर साम्राज्याचा मंत्री श्री. माधव मंत्री यांनी चौदाव्या शतकाच्या अखेरीस ते पुन्हा बांधले, अशी साक्ष मिळते.

मौर्यांपासून गोव्याच्या राजकीय इतिहासाची वाटचाल

पुराणपरंपरेनंतर गोव्याच्या इतिहासावर विविध राजसत्तांचा प्रभाव पडत गेला. सा.श. पूर्व तिसऱ्या शतकात मौर्य साम्राज्याच्या काळात सम्राट अशोकाच्या प्रभावामुळे बौद्ध धर्माचा प्रारंभिक प्रसार या प्रदेशात झाल्याचे मानले जाते. त्यानंतर सातवाहनांच्या काळात गोव्याचा सागरी व्यापार वाढला आणि रोमन जगताशी व्यापारी संबंध प्रस्थापित झाले.

पुढे पश्चिमी क्षत्रप, आभीर, भोज आदी विविध सत्तांचा कोंकणावर प्रभाव राहिला. त्यानंतर बदामीचे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांनी गोव्याला दख्खनच्या व्यापक राजकीय व्यवस्थेशी जोडले. या दीर्घ इतिहासात भोज, मौर्य, शिलाहार, कदंब आणि विजयनगर यांसारख्या राजवटींनी गोव्याच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला मोठी चालना दिली.

संपूर्ण कोंकणाचे महत्त्व वाढवताना गोव्याला कोंकणातील एक महत्त्वाचे राजकीय व सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रतिष्ठा प्राप्त झाली. सौराष्ट्र (काठियावाड), बर्बर (गुजरातची किनारपट्टी), करहाट (ठाणे, कुलाबा, रत्नागिरी), गोमंतक (सिंधुदुर्ग, गोवा, कारवार), कर्नाटक (कर्टकाचा किनारपट्टी), तुलुंग (तुलू भाषिक प्रदेश) व केरल ह्या सात महासप्तमाची (साताकोंकणाची) राजधानी एकू महत्त्व गोव्याला प्राप्त झाले.

मंदिरांचा विध्वंस

सा.श. १५१० मध्ये पोर्तुगीज सत्तेची सुरुवात झाल्यानंतर गोमंतकाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनावर मोठे संकट आले. शेकडो मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. हिंदूंची तीर्थक्षेत्रे आणि विद्यापीठे बळकावून त्यांच्या जागी चर्च उभारण्यात आली. दिवाडीतील श्री सप्तकोटेश्वर मंदिरही या विध्वंसातून सुटले नाही.

मात्र मंदिर उद्ध्वस्त झाले, तरी परंपरा नष्ट झाली नाही. देवतांची उपासना आणि भक्तांची श्रद्धा पुढे चालू राहिली. मूळ देवस्थानाच्या परंपरेचे स्थलांतर डिचोली तालुक्यातील नार्वे येथे झाले. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सा.श. १६६८ मध्ये श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला.

त्यामुळे मंदिराच्या पुनरुज्जीवनाला केवळ धार्मिकच नव्हे, तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वही प्राप्त झाले. मूळ दिवाडी मंदिराचे स्थान आजही पोर्णे तीर्थ म्हणून स्मरणात आहे. सप्तकोटेश्वराची परंपरा, दिवाडीचे तीर्थक्षेत्र आणि नार्वे येथील देवस्थान या सर्वांचा इतिहास गोव्याच्या अस्मितेशी अभिन्नपणे जोडलेला आहे.

काशीप्रमाणेच गोवा-मुक्ती आणि विद्येचे क्षेत्र

मुक्तिक्षेत्र आणि संस्कृत विद्येचे माहेरघर म्हणून काशी प्रसिद्ध आहे. या दोन्ही बाबतीत गोव्याचे काशीशी साम्य असल्याची प्राचीन परंपरा आहे.
गोकर्णादुत्तरे भागे शतयोजन विस्तृतम्तस्य गोवापुरी नाम नगरी पापनाशिनी ॥अर्थात, सुप्रसिद्ध गोकर्ण क्षेत्राच्या उत्तरेला गोवापुरी नावाचे पापनाशक क्षेत्र आहे, अशी या परंपरेत कल्पना आहे.

दिवाडी बेटाजवळ पंचनद्यांचे (महादईच्या शाखा), गोमती अर्थात मांडवी व अघनाशिनी अर्थात जुआरी नदीचे समुद्राशी होणारे संगमक्षेत्र अत्यंत पवित्र मानले गेले. या पवित्र संगमामुळे दिवाडी-नार्वे परिसराला प्राचीन काळापासून तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले.

श्री सप्तकोटेश्वर : कोंकणभूमीचे अधिष्ठान

दिवाडीतील नार्वे परिसराच्या पावित्र्याशी श्री सप्तकोटेश्वर देवस्थानाची परंपरा निगडित आहे. आख्यायिकेनुसार सप्तऋषींनी सात कोटी वर्षे तपश्चर्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले आणि सात धातूंच्या मिश्रणापासून शिवलिंगाची स्थापना केली. म्हणूनच या देवतेला सप्तकोटेश्वर हे नाव प्राप्त झाले.

या पवित्र शिवलिंगाचे केवळ दर्शन केल्याने पापनाश आणि स्पर्शाने मुक्ती प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच 'क्षेत्रं यदाधिके काश्या:' हे क्षेत्र काशीपेक्षा जडभर अधिक श्रेष्ठ आहे, अशी भक्तिपरंपरेतील भावना व्यक्त होते. श्री सप्तकोटेश्वर हे गोव्याचे केवळ अधिष्ठाता नव्हे, तर संपूर्ण कोंकणपट्टीचे अधिष्ठानदैवत मानले जाते. काशीप्रमाणेच गोवा हे तीर्थयात्रा आणि विद्येचे केंद्र होते, ही बाब गोव्याच्या इतिहासाचे वैशिष्ट्य अधोरेखित करते.

परंपरा टिकली, यात्रा क्षीण झाली

डिचोली तालुक्यात पोर्तुगीजांच्या ताब्यात गेल्यानंतर गोकुळाष्टमीची ही प्राचीन यात्रा क्षीण होत गेली. तरीही तिची परंपरा लोप पावली नाही. राजसत्ता बदलू शकते, मंदिरे उद्ध्वस्त होऊ शकतात; परंतु श्रद्धा आणि सांस्कृतिक स्मृती नष्ट होत नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT