

Shivendraraje Bhosle On Chiplun Flyover
ठाणे : मुंबई-गोवा महामार्गाचे पाच उड्डाणपूल सुरू करण्यात आले आहेत. चिपळूणचा उड्डाणपूलही गणेश चतुर्थीपूर्वी खुला होईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दै. ‘पुढारी’च्या समिट कार्यक्रमात दिली.
ते म्हणाले, मुंबई-गोवा महामार्ग पुढील सहा महिन्यांत सुरू होईल. या महामार्गाचे काम न्यायालयातील खटले, ठेकेदारांची चुकीची निवड, भूमी संपादनातील अडचणी आणि राजकीय इंटरफेअर यामुळे रखडले. मात्र मी सूत्रे हाती घेतल्यानंतर चार बैठका झाल्या आणि हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्लॅन तयार केला आहे.
मुंबई-गोवा मार्ग या गणेशोत्सवात पूर्ण करणारच या घोषणा ही आतापर्यंत केंद्रीय दळणवळण मंत्र्यांपासून तर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांपर्यंत केली होती. गणपती उत्सवासाठी ‘येवा कोकण आपलाच असा’, असे सांगून सुखदायी प्रवासाचे स्वप्न असे नेतेमंडळीनी दाखविले असले तरी, प्रत्यक्षात नेहमीच्या पावसाळ्याप्रमाणे आजवर या महामार्गाचे दुखणे कायम राहिले आहे. गेली १८ वर्षे महामार्गाचे चौपदरीकरण रखडल्याचे दिसून आले आहे. आता मुंबई-गोवा महामार्गावरील २० ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. रत्नागिरीत १७ क्षेत्रे अपघातप्रवण असल्याचे सांगितले जात आहे. भविष्यात हा महामार्ग कोकणात जाण्यासाठी सुखकर होणार असल्याचेही बोलले जात आहे.