Sanvordem Panchayat Protest 
गोवा

Sanvordem Panchayat Protest | मिराबाग बंधाऱ्याविरोधात सावर्डेवासीय आक्रमक

Sanvordem Panchayat Protest | कुडचडे तालुक्यातील प्रस्तावित बंधाऱ्याविरोधातील आंदोलन सोमवारी अधिक तीव्र झाले.

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

कुडचडे तालुक्यातील प्रस्तावित बंधाऱ्याविरोधातील आंदोलन सोमवारी अधिक तीव्र झाले. सावर्डेच्या परिसरातील ग्रामस्थांनी थेट सावर्डे पंचायत कार्यालयावर धडक देत प्रशासनाला जाब विचारला. महिला, वृद्ध तसेच लहान मुलांसह मोठ्या संख्येने नागरिक पंचायतीत दाखल झाले.

बेकायदेशीरपणे सुरू असलेले बंधाऱ्याचे काम तात्काळ थांबवावे तसेच पाण्याच्या टाकीसाठी नदीकिनारी खोदण्यात आलेला मोठा खड्डा अशी मागणी करत पंचायतीत ठिय्या आंदोलनासह पंच सदस्याला रोखण्यासाठी त्याच्या कारखाली लोळण घेण्याचाही प्रकार यावेळी घडला. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, सुमारे पाच तास या आंदोलकांनी पंचायतीला वेठीस धरले. महिला, वृद्ध तसेच लहान मुलांसह मोठ्या संख्येने नागरिक पंचायतीत दाखल झाले. बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप करण्यात आलेल्या बंधाऱ्याचे काम तात्काळ थांबवावे तसेच पाण्याच्या टाकीसाठी नदीकिनारी खोदण्यात आलेला मोठा खड्डा अद्याप न बुजवल्याबद्दल संतप्त ग्रामस्थांनी सरपंच चिन्मयी नाईक यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.

समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आंदोलकांनी ताट-चमचे वाजवत पंचायत कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनात काँग्रेसचे गटाध्यक्ष संकेत भंडारी, गौतम भंडारी यांच्यासह स्थानिक नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. मीराबाग बंधाऱ्याविरोधात गेल्या १४ दिवसांपासून साखळी आंदोलन सुरू असून मीराबाग, सांगे आणि कुडचडे परिसरातील नदीकिनारी राहणारे ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत आहेत.

आंदोलनस्थळी आमदार विजय सरदेसाई, खासदार विरियातो फर्नांडिस, माजी खासदार विनय तेंडुलकर तसेच विविध बिगर सरकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. काही दिवसांपूर्वी सावर्डे पंचायत मंडळाने आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना पाठिंबा असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप वाढला आहे.

नदीकिनारी पाण्याच्या टाकीसाठी खोदण्यात आलेला मोठा खड्डा नागरिक संकेत भंडारी व पाळीव प्राण्यांसाठी धोकादायक ठरत असल्याने तो तातडीने बुजवण्याची मागणी वारंवार करण्यात आली होती. आश्वासन देऊनही कारवाई न झाल्याने आंदोलकांनी प्रकल्पास स्वाक्षरी देणाऱ्या सरपंच नाईक यांना थेट धारेवर धरले. संकेत भंडारी यांनी खड्याबाबत विचारणा केली असता, संबंधित ठिकाणाची पाहणी करून प्रशासनाशी पत्रव्यवहार केल्याचे सरपंचांनी सांगितले.

मात्र खड्डा नेमका कोणी खोदला याची माहिती नसल्याचे उत्तर देताच वातावरण अधिक तापले. 'खड्डा कोणी खोदला हेच माहिती नाही, तर पत्रव्यवहार नेमका कोणाला केला?' असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या १४ दिवसांत पंचायत प्रशासनाने बंधाऱ्याचा प्रकल्प रोखण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून काम बंद न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.

दरम्यान, सरपंच चिन्मयी नाईक यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलकांचा संताप वाढला. परिस्थिती तणावपूर्ण होत असल्याचे पाहून सरपंचांनी आपल्या कक्षात जाणे पसंत केले. त्यांनी बाहेर येऊन भूमिका स्पष्ट करावी, यासाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

घटनेची माहिती मिळताच कुडचडे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक कुलासो घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना मागे हटण्याचे आवाहन केले. यावेळी पोलिस निरीक्षक कुलासो आणि काँग्रेस नेते संकेत भंडारी यांच्यात शाब्दिक वाद झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. सरपंचांनी बाहेर येऊन नागरिकांशी संवाद साधावा, अशी मागणी आंदोलकांनी कायम ठेवली.

पंचाच्या कारसमोर आंदोलकाची लोळण याचवेळी धडे प्रभागाचे पंच सदस्य शशिकांत नाईक आंदोलन सुरू असताना परिसरातून बाहेर जाण्यासाठी कार काढत असताना नाट्यमय घटना घडली. संकेत भंडारी यांनी गाडीसमोर येत ठिय्या मांडला. गावच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी थेट त्याच्या कारसमोर लोळण घेत आंदोलन अधिक तीव्र केले. गावाचे भले करता येत नसेल तर आपल्या अंगावरून कार चालवा, असे आव्हान त्यांनी दिल्याने वातावरण आणखी तापले.

ग्रामस्थांच्या निर्णयाला पाठिंबा : पंच नाईक मिराबागचे पंच सदस्य संजय नाईक यांच्यावर लोकांनी आरोपांच्या फेरी झाडल्या. त्यावेळी हा प्रकल्प आपण आणलेला नाही, असे आमदार गणेश गावकर यांनी भर सभेत सांगितले होते. हवे असल्यास आपण त्याचे रिकॉर्डिंग दाखवतो, असे नाईक म्हणाले. आपण गावकऱ्यांच्या विरोधात नाही. तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला माझा पाठिंबा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT