Sankalp Amonkar Goa Minister Swearing
पणजी : मुरगाव मतदारसंघाचे आमदार संकल्प आमोणकर यांचा गोवा मंत्रिमंडळात बारावे मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे. दोनापावला येथील लोकभवनच्या जुवारी सभागृहात शनिवारी (दि.७) झालेल्या शानदार शपथविधी सोहळ्यात राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी आमोणकर यांना मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते.
या शपथविधी सोहळ्याला आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याव्यतिरिक्त मंत्रिमंडळातील इतर सर्व मंत्री, आमदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, पक्षाचे पदाधिकारी तसेच आमोणकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संकल्प आमोणकर यांचा राजकीय प्रवास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) कार्यकर्ता म्हणून सुरू झाला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत सक्रिय राजकारणाला सुरुवात केली. २०२२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांनी मुरगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री मिलिंद नाईक यांचा पराभव करून ते पहिल्याच विधानसभा निवडणुकीत आमदार झाले.
निवडणुकीनंतर गोव्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. तत्कालीन विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह संकल्प आमोणकर आणि अन्य पाच आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता आमोणकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून, त्यांच्या राजकीय प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संकल्प आमोणकर यांनी समाधान व्यक्त केले. मंत्रिपद मिळण्यास उशीर झाला असला तरी ही जबाबदारी मिळाल्याचा आपल्याला आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तीन महिन्यांत चांगले काम करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच भाजपच्या राज्य आणि केंद्रीय नेतृत्वाने आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
'विकसित गोव्या'च्या दिशेने पुढील तीन महिन्यांत मंत्री म्हणून शक्य तेवढे योगदान देईन. कोणतेही खाते मिळाले तरी सोपवलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पाडेन, असा विश्वासही आमोणकर यांनी व्यक्त केला.