पणजी : पुढारी वृत्तसेवा
गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेला धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना पुनरुज्जीवित करण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यासाठी निविदा भरण्याची मुदत वाढवली आहे. राज्य सरकारच्या प्रयत्नांना प्रतिसाद मिळत असून, चार कंपन्यांनी प्रकल्पात रस दाखवला आहे.
इच्छुक कंपन्यांच्या मागणीनुसार निविदा सादरीकरणाची मुदत आता ५ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ऑनलाईन निविदा सादर करण्याची अंतिम तारीख ६ जानेवारी २०२६ तर प्रत्यक्ष निविदा ८ जानेवारीपर्यंत स्वीकारल्या जाणार होत्या. मात्र, इच्छुक कंपन्यांनी निविदा भरण्याची मुदत महिनाभर वाढवण्याची मागणी केल्याने सरकारने मुदत ५ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे.
हा कारखाना पुनरुज्जीवित करण्यासाठी सुमारे १३० कोटी रुपये खर्च केले जाणार असून, हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. कारखान्याकडे २.४ लाख चौरस मीटर जमीन विकासासाठी उपलब्ध आहे.
सध्या राज्यात सुमारे ५५० हेक्टरवर ऊस लागवड होत असून, त्यातून दरवर्षी सुमारे ६० हजार टन ऊस उत्पादन होते. २०१९-२० हंगामानंतर कारखाना बंद होण्यापूर्वी गोव्यातील ऊस पुरेसा होत नसल्याने कारखान्याला जवळच्या राज्यांतून ऊस आणावा लागत होता. पुरेसा ऊस गोव्यात उपलब्ध न होणे हेही कारखाना बंद होण्याचे एक प्रमुख कारण आहे.
यापूर्वी खासगी सहभागातून कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न यशस्वी ठरले नव्हते. २०२२ मध्ये दोन निविदादार पात्र ठरले होते; मात्र अटी पूर्ण न झाल्याने ते अपात्र ठरले. २०२४ मध्ये एकही निविदा प्राप्त झाली नव्हती. प्रस्तावानुसार या कारखान्यात कृषी खाते दररोज किमान ३,५०० टन ऊस गाळप क्षमता, इथेनॉल प्रकल्प आणि बॉटलिंग युनिट उभारण्याचा मानस ठेवून आहे.