मडगाव : पुढारी वृत्तसेवा
सासष्टी तालुक्याची जीवनवाहिनी मानली जाणारी साळ नदी सध्या प्रदूषण, गाळ साचणे आणि जलवनस्पतींच्या प्रचंड वाढीमुळे गंभीर अवस्थेत पोहोचली आहे. अनेक ठिकाणी नदीवर बॉटर हायसिंथचा (जलवनस्पती) जाड थर पसरल्याने नदीचे पाणी अक्षरशः झाकले गेले असून तिचा नैसर्गिक प्रवाह अडथळला आहे.
परिणामी, नदीचे पर्यावरणीय संतुलन बिघडत असून स्थानिक मच्छीमार तसेच नदीकाठच्या गावांतील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. साळ नदीतील वाढते प्रदूषण, गाळ साचणे आणि सांडपाण्याचा निचरा यामुळे नदीची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अनेक ठिकाणी गटारांचे पाणी थेट नदीत मिसळत असल्याने पाण्याची गुणवत्ता खालावत आहे.
त्यामुळे जलचरांवर परिणाम होत असून नदीवर अवलंबून असलेल्या मच्छीमार समुदायालाही त्याचा फटका बसत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, साळ नदीसाठी महत्त्वाच्या असलेल्या भरती रेषा आणि ओहोटी रेषा सीमारेषा अद्याप राज्याच्या डिजिटल जमीन नोंदीत समाविष्ट झालेल्या नाहीत.
२०११ च्या किनारी नियमन अधिसूचनेनुसार किनारी भागातील पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी तसेच नदीकाठच्या विकासकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या सीमारेषा अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.
मात्र, साळ नदीसाठी या सीमारेषांची नोंद भू नकाशा, या डिजिटल जमीन नकाशा प्रणालीत अद्याप समाविष्ट करण्यात आलेली नाही भू नकाशा ही जमीन नोंदींचे डिजिटल नकाशे उपलब्ध करून देणारी महत्वाची प्रणाली असून त्यात ज्वारीय सीमारेषा नसल्यामुळे किनारी भागातील जमीन वापर नियोजन तसेच सीआरझेड नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासनाला अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
केळशी सरपंचांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
दरम्यान, साळ नदीतील वाढत्या जलवनस्पतींच्या समस्येबाबत केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून चिंता व्यक्त केली आहे. दरवर्षी, साळ नदीवर वॉटर हायसिंथचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असून त्यामुळे नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर अडवला जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
ज्वारीय सीमारेषा सीमांकनाचे मोठे महत्त्व देसाई
साळ नदीचे पर्यावरणीय आणि आर्थिक महत्त्व लक्षात घेता नदी स्वच्छता, गाळ काढणे, जलवनस्पती हटविणे तसेच सांडपाण्याचे स्रोत रोखणे या उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तसेच भरती आणि ओहोटी रेषा आणि ज्वारीय सीमारेषा डिजिटल जमीन नोंदीत समाविष्ट करून नदीकाठच्या भागातील विकासकामांवर योग्य नियंत्रण ठेवण्याची मागणी पर्यावरणप्रेमी आणि प्राचार्य संजय देसाई यांनी केली आहे.