

पणजी : पुढारी वृत्तसेवा
आरजीचे आमदार विरेश बोरकर यांनी विजय सरदेसाई यांनी सरकारबरोबर सेटिंग केल्याचा आरोप सोमवारी सभागृहाबाहेर आल्यावर केला होता. सर्व विरोधकांना मार्शलकरवी बाहेर काढल्यावरही फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई सभागृहात बसून राहिले, याबाबत त्यांनी संताप व्यक्त केला.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सरदेसाई यांनी या आरोपाचे खंडन केले आहे. ते म्हणाले, सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन बुलडोझ केले आहे. इतरांचाही तोच आरोप होता. मी मागे राहिलो कारण २०१३ साली अशीच वेळ आली तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लेखा अनुदान मागण्या संमत करून घेतल्या होत्या. तेव्हा मी सभागृहाचा सदस्य होतो, मुख्यमंत्री प्रमोद सावंतही सभागृहाचे सदस्य होते.
विरोधातील इतर आमदार तेव्हा सदस्य नव्हते. माझी मागणी होती की सरकारने अर्थसंकल्प मंजूर करण्याऐवजी लेखा अनुदान घ्यायला हवे होते. यात सेटिंग कसले असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. हे सरकार लोकशाही संकेत पाळत नाहीत हेच मला सांगायचे होते. नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्या घरावर चालून जाण्यास नकार दिल्याच्या निर्णयाचेही त्यांनी समर्थन केले. ते म्हणाले कोणाच्याही खासगी निवासस्थानी मोर्चा नेणे, दगडफेक करणे चुकीचे आहे.
मी एवढ्या वर्षांच्या राजकारणात असे कधीही केलेले नाही. मी काही तत्त्वे राजकारणात पाळतो. उद्या दामू नाईक यांच्या घरावर मोर्चा नेल्यावर मी दुसऱ्या दिवशी निवडणूक जिंकणार असे कुणी सांगितले तरी मी ते करणार नाही. विरोधकांच्या आघाडीबाबतही त्यांनी आशावाद व्यक्त केला. ती गोष्ट लोकांना हवी आहे.
मी आताच ते होणार नाही असे सांगून मिठाचा खडा टाकणार नाही. लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात विरोधक एकत्र आले होते. आम्ही सर्वांनी एकत्र काम केले होते. आताही एकत्र येतील असे ते म्हणाले. येत्या पालिका निवडणुकीत मडगावात उमेदवार उभे करणार असल्याचे ते म्हणाले. कारण केवळ फातोड्र्ध्यात उमेदवार देऊन पालिकेत सत्ता येऊ शकणार नाही. पूर्वी माझे आणि दिगंबर कामत यांचे याबाबत सामंजस्य होते. माझी सत्ता येणारच नाही हे माहीत असताना मतदार नाहीतर मला कशाला मतदान करतील असा प्रतिप्रश्नही त्यांनी विचारला.
बाबूश म्हणतात ते बरोबर...
महापालिका निवडणुकीत विरोधक एकत्र येऊनही विजय मिळवता आला नाही याबद्दल ते म्हणाले की, याबाबत बाबूश म्हणतात ते बरोबर आहे. तुम्ही सतत लोकांबरोबर राहिले पाहिजे. त्यांच्यासाठी जमिनीवर काम केले पाहिजे. पण विरोधकांची कामगिरी एवढी वाईट नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.