Rohan Gavas Desai Politics: दक्षिण गोव्यातील कुडचडे मतदारसंघात सध्या दोन नावांची चर्चा आहे. एक विद्यमान आमदार नीलेश काब्राल आणि दुसरे त्यांचेच पक्षांतर्गत स्पर्धक मानले जाणारे रोहन गावस देसाई. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या तिकीट शर्यतीत रोहन हे नवे, पण वेगाने उदयास येणारे नाव आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना ते नजीक असल्याचे मानले जाते.
रोहन गावस देसाई हे मूळचे कुडचडे-काकोडा भागातील. रोहन प्रकाशझोतात आले ते क्रिकेटमुळे. ऑक्टोबर २०२२ मध्ये ते गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव झाले. नोव्हेंबर २०२४ मध्ये भारतीय पुरुष संघ दक्षिण आफ्रिकेत ४ सामन्यांची टी २० मालिका ३-१ ने जिंकला, तेव्हा भारतीय संघाचे मॅनेजर म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
१ मार्च २०२५ रोजी मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत ते बीसीसीआयचे संयुक्त सचिव म्हणून बिनविरोध निवडले गेले. या पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज होता. गोव्यासाठी ही गोष्टी ऐतिहासिक होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र व आयसीसीचे चेअरमन जय शहा यांच्याशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. बीसीसीआयमध्ये गेल्यानंतर त्यांनी गोव्यात पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणण्याची ग्वाही दिली होती. गोव्यात आंतरराष्ट्रीय स्टेडियम व्हावा यासाठीही ते प्रयत्नशील होते.
गेल्या ८-१० महिन्यांत रोहन यांनी कुडचडे मतदारसंघात अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आपली उपस्थिती वाढवली आहे, ज्यामुळे नीलेश काब्राल यांची अस्वस्थता वाढल्याचे बोलले जाते. त्यांनी क्रीडा स्पर्धांपासून अनेक सामाजिक कामेही केली. स्थानिक युवकांसाठी क्रिकेट आणि बॅडमिंटन स्पर्धा, पावसाळ्यापूर्वी जवळपास २०० विहिरींची स्वच्छता मोहीम, मोफत वैद्यकीय शिबिरे त्यांनी भरवली.
रोहन हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा त्यांना उघड पाठिंबा मिळताना दिसतो. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र सावईकर यांनी अलीकडेच फेसबुक पोस्टमध्ये रोहन गावस देसाई आणि शेजारच्या सावर्डे मतदारसंघातील इच्छुक संकेत आरसेकर यांना “टेकऑफसाठी तयार असलेली दोन फायटर जेट्स” असे म्हटले होते, ज्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबतच्या चर्चेला अधिकृत मानले गेले.
नीलेश काब्राल यांनी अलीकडेच ‘मतदारसंघात मला डावलून इतर लोक काम करतात’ अशी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यांचा रोख अप्रत्यक्षपणे रोहन यांच्याकडेच होता. एका बाजूला तीन वेळा निवडून आलेला, माजी मंत्री असलेला अनुभवी नेता, तर दुसऱ्या बाजूला बीसीसीआयसारख्या बलाढ्य संस्थेत गोव्याचे प्रतिनिधित्व करणारा, स्वच्छ प्रतिमा असलेला युवा चेहरा - असा हा सामना आहे.