Sal River Pollution  Pudhari File Photo
गोवा

Goa Sal River | दै. 'पुढारी'च्या बातमीचा दणका! केळशीतील खारफुटी तोडप्रकरणी वन खाते खडबडून जागे; चौकशीला वेग

Goa Sal River | दै. पुढारीने उघड केला होता प्रकार; होडीच्या साहाय्याने अधिकाऱ्यांकडून पाहणी

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

केळशी परिसरातील साळ नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात खारफुटी वृक्षांची तोड व पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात मानवी हस्तक्षेप झाल्याचा प्रकार दै. 'पुढारी'ने समोर आणल्यानंतर वन खाते खडबडून जागे झाले आहे. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून चौकशीला वेग दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केळशी येथील साळ नदीलगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर खारफुटी वृक्षांची तोड करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यासंदर्भातील वृत्त दै. 'पुढारी'तून प्रसारित झाल्यानंतर संबंधित परिसरातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. या संदर्भात व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्येही मोठ्या प्रमाणात तोडण्यात आलेले वृक्ष, कापलेले बुंधे तसेच साफसफाई करण्यात आलेला परिसर असल्याने पर्यावरणप्रेमींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली होती.

दिसताना प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित भाग नदीकाठचा व दाट झाडीने वेढलेला असल्याने अधिकाऱ्यांना पाहणीसाठी नदीमार्गाचा वापर करावा लागला. बोटीच्या साहाय्याने अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी खारफुटी क्षेत्रात हस्तक्षेप झाल्याचे निदर्शनास आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मात्र, नुकसानीचे नेमके प्रमाण, किती क्षेत्र प्रभावित झाले आहे आणि किती खारफुटी वृक्ष नष्ट झाले आहेत, याचा अंतिम अहवाल अद्याप तयार करण्यात आलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, प्राथमिक पाहणीनंतर वन खात्याने या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहण्यास सुरुवात केली असून दोषी आढळणाऱ्या व्यक्ती किंवा जमीनमालकांविरोधात कायदेशीर कारवाईचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.

चौकशी अहवालाच्या आधारे गुन्हा नोंदविण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, सरपंच डिक्सन वाझ यांनीही प्रकरणाची माहिती मिळताच वन खात्याशी संपर्क साधून अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी आवश्यक सहकार्य केल्याचे समजते. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पातळीवर या विषयावर चर्चा सुरू झाली असून अनेक नागरिकांनी पर्यावरणीय नुकसानाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

केळशी परिसरातील कथित खारफुटी नाशामुळे स्थानिक पर्यावरणावर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः साळ नदीच्या किनाऱ्यालगतची जैवविविधता, मत्स्यसंपत्ती आणि किनारी संरक्षण व्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी खारफुटी क्षेत्रांचे संरक्षण अधिक मजबूत करावे, अशी मागणी स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. आता वन खात्याच्या अंतिम अहवालाकडे आणि पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

वन खात्याकडून जमिनीची मोजणी...

वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी संबंधित जागेची मोजणी, जमिनीची मालकी आणि तेथे करण्यात आलेल्या कामांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. संबंधित भाग खासगी मालकीचा आहे की सरकारी, तसेच कोणत्याही प्रकारच्या विकासकामासाठी अथवा साफसफाईसाठी अधिकृत परवानगी घेण्यात आली होती का, याची पडताळणी केली जात आहे. त्याचबरोबर किनारी नियमन क्षेत्र (सीआरझेड) नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याचाही तपास सुरू आहे.

खारफुटी किनारी परिसंस्थेचा महत्त्वाचा घटक...

पर्यावरण अभ्यासकांच्या मते, खारफुटी ही केवळ झाडे नसून किनारी परिसंस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. खारफुटी वृक्ष समुद्रकिनारी धूप रोखण्यास मदत करतात. पूरस्थितीचा धोका कमी करतात आणि विविध प्रकारच्या मासे, खेकडे व इतर जलचरांच्या प्रजननासाठी सुरक्षित अधिवास उपलब्ध करून देतात. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कार्बन शोषून घेण्याची क्षमता असल्याने खारफुटी क्षेत्रांचे संवर्धन अधिक महत्त्वाचे मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT