मडगाव : वार्का येथे मालमत्तेच्या जुन्या वादातून एका महिलेवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. लासिमा गाल्डिनो यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी संशयित ज्यो परेरा याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि चोरीचा गुन्हा कोलवा पोलिसांनी नोंदवला आहे.
वार्का परिसरात शुक्रवारी भर दुपारी मालमत्तेच्या वादातून हा हल्ला घडला. ही घटना समोर येताच स्थानिकांमध्ये भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संशयित ज्यो परेरा पळून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, वार्का येथील फिडमोअर रेस्टॉरंटजवळ लासिमा गाल्डिनो आणि ज्यो परेरा यांच्यात मालमत्तेसंबंधी वाद सुरू होता. शाब्दिक वादाचे रूपांतर थेट मारहाणीमध्ये झाले.
पोलिसांनी सांगितले की, संशयित ज्यो परेरा याने लोखंडी रॉड उगारून लासिमा गाल्डिनो यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तत्काळ बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर परेरा घटनास्थळावरून पसार झाला. पळताना त्याने लासिमा यांचा मोबाईलनही चोरून नेल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 307 हे खुनाचा प्रयत्न आणि चोरीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.