

धावे : आंबेडे नगरगाव सत्तरी येथील नगरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या स्वयंसेवा भांडाराला शुक्रवारी मध्यरात्री आग लागली. शॉर्टसर्किट होऊन हा प्रकार घडला. परंतु, संस्थेची सर्व दारे बंद होती. संंस्थेच्या सीसीटीव्हीमध्ये उत्तररात्री धूर आल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे.
संस्थेचा कर्मचारी सकाळी 8 वा. चावी उघडून आत आला, तेव्हा स्वयंसेवा भांडाराच्या मागच्या बाजूच्या पॅकिंग विभागाला आग लागल्याचे त्याच्या निदर्शनास आले. संस्थेचे व्यवस्थापक व अग्निशमनदलाला घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी लागलीच धाव घेऊन आग आटोक्यात आणली. पॅकिंग विभागाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.
तसेच स्वयंसेवा भांडाराचेसुद्धा एका बाजूने नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेतल्यामुळे पाच लाखांहून अधिक रकमेचे सामान वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. शॉर्टसर्किटमुळे आगीचा भडका उडाला व मागच्या बाजूला असलेल्या प्लायवूडच्या पार्टिशनने पेट घेतला. यात इमारत वीज फिटिंग, फॅन, एसी, ट्यूब, बल्ब, पॅकिंग मशीनरी, पार्टिशन, विक्रीसाठी ठेवलेले सामान असे मिळून पाच लाखांहून जास्त रकमेचे नुकसान झाल्याचा दावा संस्थेचे अध्यक्ष प्रसाद खाडिलकर यांनी केला आहे. अग्निशमन दलाचे ज्ञानेश्वर गावस यांच्या मार्गदर्शनाखाली बाबुराव गावस, रामा नाईक, प्रदीप गावकर, सोमनाथ गावकर, रूपेश गावकर यांनी आग आटोक्यात आणण्यात मोलाची कामगिरी बजावली.