goa assembly winter session  Pudhari
गोवा

Goa Assembly Election | गोवा विधानसभेत 2027 मध्ये भाजप-मगो, काँग्रेस-गोवा फॉरवर्ड-आरजी आणि 'आप' यांच्यात तिरंगी लढतीची शक्यता

Goa Assembly Election | निवडणुकीत जादा जागा लढविण्याच्या अट्टाहासापायी युती होण्यावर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
२०२७ ची विधानसभा निवडणूक भाजप-मगो युती, काँग्रेस-गोवा फॉरवर्ड आरजी युती आणि आम आदमी पक्ष अशी तिरंगी होण्याचे चित्र सध्या दिसत आहे. मात्र, सर्वच राजकीय पक्षांना जास्तीत जास्त जागा मिळवून त्या लढवण्याची महत्त्वाकांक्षा असल्याने युती तुटू शकतात, असे मत राजकीय निरीक्षकांनी नोंदवले आहे.

२६ आमदार असलेल्या भाजपने ३० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. फोंडा व शिरोड्यासह सात जागा मगोला हव्यात अशी घोषणा मगो नेते व वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.
तीन आमदार असलेली काँग्रेस स्वतः जास्तीत जास्त जागा लढवण्याची तयारी करत असून २७ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवून आहे.

एक आमदार असलेला गोवा फॉरवर्ड किमान ९ जागा हव्यात अशी मागणी करत आहे. त्यातच एक आमदार असलेला आरजी पक्षही किमान ६ जागा हव्यात अशी मागणी करत आहे. त्यामुळे सध्या दोन महत्त्वाच्या युती आकार घेत असल्याचे वाटत असले तरी प्रत्यक्ष जागावाटपावेळी जादा जागांच्या मागणीमुळे युती तुटू शकतात, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.

२०२७ च्या विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्ष सज्ज होत असताना, सत्ताधारी आणि विरोधकांनी युतीची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी, वाटाघाटी अद्याप केवळ निवेदनांपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत.
भाजप आणि त्यांचा मित्रपक्ष मगो हे निवडणुकीपूर्वी युतीसाठी अनुकूल असले तरी राजकीय महत्त्वाकांक्षा त्याच्या आड येत आहेत. कारण दोन्ही पक्ष जास्तीत जास्त मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. फोंडा, प्रियोळ, शिरोडा व पेडणे, डिचोली या पाच जागांवरून या दोन्ही पक्षांत संघर्ष होण्याची शक्यता दिसत आहेत.

काँग्रेस - गोवा फॉरवर्डमध्ये अद्याप चर्चाच नाही

विरोधी पक्षांच्या आघाडीवरही परिस्थिती गुंतागुंतीची दिसते. भाजपविरोधी मते एकसंध ठेवण्यासाठी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड व आरजी एकत्र येणार अशी चर्चा असली तरी आप त्यांच्या संभाव्य आघाडीत तयार नाही.

आपचे नेते वारंवार काँग्रेसवर टीका करत आहेत. आरजी व काँग्रेसची एकदा चर्चा झालेली असली तरी गोवा फॉरवर्डने अद्याप काँग्रेस सोबत युतीबाबत चर्चा केलेली नाही. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मगोने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. भाजपला २० जागा मिळाल्या.

मगोला तृणमूल काँग्रेस सोबत युती करून १६ जागा लढवून केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. मांद्रेत लक्ष्मीकांत पार्सेकर अपक्ष राहिले नसते, तर जीत आरोलकर यांना विजय मिळवणे कठीण होते. प्राथमिक आघाडीच्या चर्चा सुरू झाल्या असून अंतिम निर्णय केंद्रीय समिती घेईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.

मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर व भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनीही तशीच प्रतिक्रिया दिलेली आहे. मात्र, सुदिन ढवळीकर यांनी मगो पक्ष विधानसभेसाठी १३ मतदारसंघांमध्ये काम करत असल्याची घोषणा करत युती झाल्यास किमान सात जागा हव्यात, असे म्हटले असल्याने भाजपचे केंद्रीय नेते यावर काय तोडगा काढतात ते पाहावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT