पर्वरी : शेखर वायंगणकर
जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल ज्या दिवसापासून लागला त्या दिवसापासून पर्वरी मतदारसंघातील सुकूर आणि पेन्ह द फ्रान्स पंचायत क्षेत्रात मतदारांमध्ये उत्साह संचारला होता. आता दि. २० रोजी मतदान आणि दि.२२ रोजी निवडणुकीचा निकाल याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा पंचायत दोन मतदारसंघ सुकूर आणि पेन्ह द फ्रान्स या दोन मतदारसंघात सुकूर, सांगोल्डा आणि पर्रा या तीन पंचायतींचा समावेश झाल्यामुळे येथील उमेदवारांना मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास आणि घरोघरी प्रचार करताना विशेष मेहनत घ्यावी लागली असून येत्या निवडणूक निकालात कोणाचा जय होईल, याची उत्सुकता तेथील लागली आहे.
यातील उमेदवार अमित अस्नोडकर (भाजप), चेतन कामत (आप), गोरक्षनाथ मांद्रेकर (काँग्रेस), तियोतोनिओ लोबो (आरजी) आणि कार्तिक कुडणेकर (अपक्ष) हे रिंगणात आहेत, तर पेन्ह द फ्रान्स मतदारसंघातून संदीप साळगावकर (भाजप), अरविंद तेंडुलकर (आप), एल्ड्रीच डिसोजा (काँग्रेस) आणि रोहन धावडे (आरजी) हे उमेदवार रिंगणात आहेत.
विरोधी गटातील काँग्रेस, आप आणि आरजी यांच्या प्रचाराचा जोर यावेळी दिसून आला नाही. खरी लढाई भाजप व काँग्रेसमध्ये सत्तारूढ सरकारातील तीन आमदार रोहन खंवटे, केदार नाईक आणि मायकल लोबो यांचा प्रत्यक्ष सहभाग भाजप उमेदवारांना लाभल्यामुळे आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी कार्यरत असल्यामुळे भाजपचे पारडे जड झाल्याचे चित्र आहे. तर काँग्रेस पक्षाची पारंपरिक मते त्यांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदारांचा कौल ऐन मतदानाच्या दिवशी कोणाकडे जाईल हे निकालानंतर दिसून येईल.