Goa Porvorim flyover accident report update 
गोवा

Goa Porvorim flyover accident report update|पर्वरी उड्डाणपुलावरील अपघात अहवालाची प्रतीक्षा कायम

बैठकीत माहिती उघड; उत्तर गोवा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

नव्याने उभारण्यात आलेल्या पर्वरी येथील सहा पदरी उड्डाणपुलावर दि. १२ सप्टेंबर रोजी झालेल्या अपघाताचा विश्लेषण अहवाल तसेच या प्रकल्पाच्या उद्घाटनपूर्व सुरक्षा ऑडिट आणि एकूणच बांधकामाच्या देखरेखीसाठी जबाबदार असलेल्या यंत्रणा व अधिकाऱ्यांचा तपशील सार्वजनिक बांधकाम खात्याने अद्याप सादर केला नसल्याचे उत्तर गोवा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत उघड झाले.

उत्तर गोवा जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण हिरे परब यांच्या अध्यक्षतेखाली समितीची ही बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा, अपघात नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याला अहवाल सादरीकरणासाठी डिसेंबरमधील पुढील बैठकीपर्यंत वाढीव वेळ दिला आहे. तसेच बांबोळी येथील हॉली क्रॉस जवळ प्रस्तावित असलेल्या 'फूट ओव्हरब्रिज'चे महत्त्व आणि फायदे सर्व संबंधितांना व नागरिकांना समजावेत, यासाठी एका माहितीपत्रकाची निर्मिती करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आले आहेत.

दि. १५ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत 'रस्ते अपघात पीडितांचा जागतिक स्मरण दिन' गांभीर्याने पाळण्याचे आवाहन समितीच्या सर्व सदस्य व संबंधित विभागांना करण्यात आले आहे. अल्पवयीन मुलांद्वारे होणाऱ्या वाहन चालवण्यावर बंदी घालण्यासाठी आणि जनजागृतीसाठी शिक्षण विभागाने विशेष कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले आहेत. यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांना एडीईआयमार्फत आवश्यक परिपत्रके जारी केली जातील. तसेच, वाहतूक खाते आणि वाहतूक पोलिस या मोहिमेसाठी आवश्यक माहिती व जनजागृती साहित्य उपलब्ध करून देतील.

महामार्गावरील भटक्या जनावरांचा प्रश्न

राष्ट्रीय व राज्य महामार्गावरून भटके गुरे हटवण्याबाबतचा कृती आराखडा आणि प्राणी-वाहन अपघाताप्रसंगी द्यावयाच्या भरपाईच्या अटी सादर करण्यासाठी पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा विभागाने वेळ मागितला आहे. या आराखड्यात सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्याचे निर्देश पशूसंवर्धन खात्याला देण्यात आले आहेत. दरम्यान, या बैठकीत ऑक्टोबर महिन्यात झालेल्या प्राणघातक अपघातांच्या पार्श्वभूमीवर, संबंधित पोलिस ठाण्यांच्या अपघात विश्लेषण समितीला त्वरित आपल्या शिफारसी सादर करण्याची विनंती करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT