Jit Arolkar MGP  
गोवा

Jeet Arolkar MGP | मांद्रेत नव्या समीकरणांची नांदी : आमदार जीत आरोलकर यांच्या भूमिकेकडे लक्ष

Jeet Arolkar MGP | मांद्रेत नव्या समीकरणांची नांदी : आमदार जीत आरोलकर यांच्या भूमिकेकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : निवृत्ती शिरोडकर

राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो, या प्रचलित उक्तीचा प्रत्यय सध्या मांद्रे विधानसभा मतदारसंघात येताना दिसत आहे. एकेकाळी निवडणुकीच्या रणांगणात परस्परांविरोधात उभे ठाकलेले माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर आणि माजी आमदार दयानंद सोपटे आता विविध धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसू लागले आहेत.

त्यामुळे या दोन नेत्यांची वाढती जवळीक केवळ कार्यक्रमापुरती मर्यादित आहे की आगामी विधानसभा निवडणुकीसाठीच्या नव्या राजकीय समीकरणांची ही सुरुवात आहे, याची मतदारसंघात रंगू लागली आहे.
मांद्रे हा एकेकाळी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा बालेकिल्ला होता. ॲड. रमाकांत खलप यांनी मगोच्या 'सिंह' निशाणीवर १९८९, १९९०, १९९४ आणि १९८९ निवडणुकीमध्ये विजय मिळवत मतदारसंघावर मजबूत राजकीय पकड निर्माण केली होती.

१९९४ मध्ये काँग्रेसच्या संगीता परब यांनी खलप यांचा पराभव करून मगोच्या वर्चस्वाला मोठा धक्का दिला. मात्र, १९९९ मध्ये खलप यांनी पुन्हा राजकीय मुसंडी मारत ५,४०९ मते मिळवली आणि संगीता परब यांचा १,१८२ मतांनी पराभव केला. त्यामुळे मांद्रेच्या राजकीय पटावर मगोने पुन्हा आपले स्थान मजबूत केले.
२००२ नंतर मात्र मतदारसंघात प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाचा उदय झाला, त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर २००२, २००७ आणि २०१२ अशा सलग तीन निवडणुका जिंकल्या, पुढे त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्रीपदही भूषविले. मगोचा पारंपरिक प्रभाव असलेल्या मांद्रे मतदारसंघात भाजपची संघटनात्मक पाळेमुळे मजबूत करण्यातसुद्धा पार्सेकर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत मांद्रेच्या राजकारणाने अनपेक्षित वळण घेतले. काँग्रेसचे उमेदवार दयानंद सोपटे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा तब्बल ७,१९५ मतांनी पराभव केला. सोपटे यांना १६,४९०, तर पार्सेकर यांना ९,३९५ मते मिळाली होती. त्यानंतर २०१८ मध्ये सोपटे यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यामुळे २०१९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर १३,४६८ मते मिळवत ४,१२५ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. मांद्रेत भाजपला पुन्हा आमदार मिळाला; मात्र पार्सेकर आणि सोपटे यांच्या समर्थकांमधील राजकीय दरी पूर्णपणे मिटली नसल्याची चर्चा कायम राहिली.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मगोचे जीत आरोलकर यांनी १०,३८७ मते मिळवत भाजपच्या दयानंद सोपटे यांचा अवघ्या ७१५ मतांनी पराभव केला. सोपटे यांना ९,६७२ मते मिळाली. या पराभवामागे भाजपमधील अंतर्गत मतभेद आणि पार्सेकर-सोपटे समर्थकांमध्ये राहिलेली दरी हेही महत्त्वाचे घटक ठरल्याची चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात झाली होती.

काही कार्यकर्ते पार्सेकर यांच्या बाजूने, तर काही सोपटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहिल्याने भाजपची एकसंध ताकद पूर्ण क्षमतेने निवडणुकीच्या मैदानात उतरू शकली नाही, असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता.

कटुतेवर पडदा की राजकीय गरज?

अलीकडच्या काळात मात्र मांद्रेतील राजकीय चित्र हळूहळू बदलताना दिसत आहे. पार्सेकर आणि सोपटे विविध धार्मिक, सामाजिक तसेच पक्षीय कार्यक्रमांमध्ये एकत्र उपस्थित राहत आहेत. दोन्ही नेत्यांमधील संवाद वाढल्याचे दिसत असून त्यांच्या समर्थकांनाही जवळ आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. ही भूमिका निवडणुकीपर्यंत कायम राहिल्यास भाजपच्या जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली दरी काही प्रमाणात भरून निघू शकते. मात्र त्यासाठी केवळ दोन नेत्यांनी हात मिळविणे पुरेसे ठरणार नाही, गावागावांतील त्यांच्या समर्थकांचेही मनोमिलन घडवून आणावे लागणार आहे.

...तर भाजप अधिक भक्कम

पार्सेकर-सोपटे दोन्ही नेत्यांची राजकीय ताकद आणि कार्यकर्त्यांचे जाळे खऱ्या अर्थाने एकत्र आले, तर आगामी निवडणुकीत भाजप अधिक संघटितपणे मैदानात उतरू शकतो. मागील निवडणुकीतील विजयाचे अंतर अवघे ७१५ मतांचे होते. त्यामुळे भाजपमधील दोन प्रमुख प्रवाहांची एकजूट झाल्यास मगो आणि विद्यमान आमदार जीत आरोलकर यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.

विद्यमान आमदार जीत आरोलकर यांनी मतदारसंघात स्वतंत्र जनसंपर्क निर्माण केला आहे. कार्यकर्त्यांची फळी, मगोची पारंपरिक मतपेढी आणि आमदार म्हणून मतदारसंघात उभारलेले राजकीय अस्तित्व ही त्यांची बलस्थाने आहेत. विविध विकासकामांचा पाठपुरावा आणि मतदारांशी थेट संपर्काच्या माध्यमातून त्यांनी आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

भाजप-मगो युतीचे गणित ठरणार निर्णायक

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मगो स्वतंत्रपणे लढणार की राजकीय तडजोड करणार, हा मांद्रेतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. दोन्ही पक्षांमध्ये निवडणूक तडजोड झाल्यास मांद्रेची जागा कोणाच्या वाट्याला जाणार, हा कळीचा मुद्दा बनेल. मांद्रेत विद्यमान आमदार मगोचे असल्यामुळे पक्ष ही जागा सहज सोडण्याची शक्यता नाही.

दुसऱ्या बाजूला भाजपकडे पार्सेकर आणि सोपटे यांच्यासारखे दोन अनुभवी दावेदार असल्याने ही जागा मगोला देणे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना कितपत मान्य होईल, हाही प्रश्न उपस्थित होणार आहे. भाजप आणि मगो स्वतंत्रपणे मैदानात उतरल्यास पार्सेकर-सोपटे यांची एकजूट विरुद्ध जीत आरोलकर यांची विद्यमान ताकद, असा थेट आणि चुरशीचा राजकीय सामना पाहायला मिळू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT