goa assembly winter session  Pudhari
गोवा

Savordem constituency | सावर्डेत गणेश गावकर यांच्यासमोर ‘आरसेकर’ आव्हान

Savordem constituency | सावर्डेत राजकीय घडामोडींना वेग; सभापती गणेश गावकऱ्यांसमोर संकेत आरसेकरांचे आव्हान!

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा
सावर्डे विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम सुरू झाली आहे. विद्यमान आमदार तथा सभापती गणेश गावकर यांच्यासमोर भाजपचेच संकेत आरसेकर यांचे वाढते राजकीय प्रस्थ डोकेदुखी ठरू लागले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा देऊन आरसेकर यांनी पक्ष संघटनेसाठी सक्रिय होण्याचे संकेत दिले. पण, हे केवळ सामाजिक कार्य म्हणून पाहिले जात नाही. दूधसागर जीप-टॅक्सी व्यावसायिकांशी संघर्ष, तसेच इतर स्थानिक प्रश्नांवरून निर्माण होणारी नाराजी गावकर कशी दूर करतात हे पाहावे लागेल. २०२२ मध्ये सर्व शक्ती पणाला लावून पुन्हा निवडून आलेल्या गावकऱ्यांसमोर यावेळी स्वकीयांचेच आव्हान उभे राहत असल्याचे चित्र आहे.

सभापती गणेश गावकर यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहणे महत्त्वाचे ठरते. २०१२ मध्ये भाजपच्या उमेदवारीवर विजय मिळवून गावकरांनी सावर्डेच्या राजकारणात आपले स्थान निर्माण केले. मात्र २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांच्या राजकीय कारकीर्दीला मोठा धक्का देणारी ठरली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या उमेदवारीवर रिंगणात उतरलेल्या दीपक पावसकर यांनी गावकरांचा ९ हजार २२१ मतांनी पराभव केला.

पावसकरांना १४ हजार ५७५ मते, तर गावकरांना ५ हजार ३५४ मते मिळाली. मात्र सावर्डेचे राजकारण येथेच थांबले नाही. २०१७ मध्ये गावकरांचा पराभव करणारे दीपक पावसकर पुढे भाजपमध्ये दाखल झाले. २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी मिळाली. त्यामुळे पावसकर हे केवळ सावर्डेचे आमदार राहिले नाहीत, तर राज्याच्या राजकारणात मंत्री म्हणून त्यांचे वजन वाढले.

परंतु २०२२ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने सावर्डेची उमेदवारी पावसकरांना न देता पुन्हा गणेश गावकर यांच्यावर विश्वास दाखवला. या निर्णयाने सावर्डेच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली. उमेदवारी नाकारल्याने पावसकरांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. अखेर गावकरांनी ११ हजार ८७९ मते मिळवत पावसकरांचा ५ हजार ९१० मतांनी पराभव केला. २०१७ मध्ये झालेल्या पराभवाचा राजकीय हिशेब गावकरांनी पाच वर्षांनी चुकता केला. २०२२ चा विजय हा गावकरांसाठी राजकीय अस्तित्व सिद्ध करणारा ठरला. त्यानंतर विधानसभेच्या सभापतीपदापर्यंत त्यांची झालेली वाटचाल ही त्यांच्या राजकीय उंचीची साक्ष मानली जाते.

२५ सप्टेंबर २०२५ पासून गावकर गोवा विधानसभेचे सभापती आहेत. त्यामुळे आजच्या घडीला त्यांचे राजकीय वजन २०२२ च्या तुलनेत निश्चितच वाढलेले आहे. मात्र, दूधसागर धबधब्यावरील पर्यटन व्यवस्थापन, जीप-टॅक्सी व्यावसायिकांचे प्रश्न आणि सरकारी यंत्रणेची भूमिका यावरून गावकर आणि स्थानिक व्यावसायिकांमध्ये मतभेद आहेत.

ही नाराजी कमी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. या पार्श्वभूमीवर संकेत आरसेकर यांचे नाव सावर्डेच्या राजकारणात पुढे येणे महत्त्वाचे ठरते. आरसेकर हे आतापर्यंत मुख्यमंत्री कार्यालयाशी जोडलेले युवा भाजप नेते म्हणून सक्रिय होते. आता त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील पदाचा राजीनामा दिल्याने त्यांची राजकीय सक्रियता ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरची तयारी मानली जाऊ लागली आहे.

या सगळ्या समीकरणांत दीपक पावसकर यांची भूमिका सर्वात गुंतागुंतीची ठरणार आहे. २०२४ मध्ये भाजपमध्ये पुनरागमन केल्यानंतर त्यांनी २०२७ ची विधानसभा निवडणूक सावर्डेतून लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे पावसकरांची राजकीय महत्त्वाकांक्षा लपलेली नाही. सावर्डेचे राजकीय समीकरण मात्र आता पूर्वीपेक्षा वेगळी परिस्थिती आहे. २०२२ मध्ये त्यांच्याकडे माजी आमदार आणि मंत्री म्हणून असलेली ताकद होती; परंतु निवडणुकीत गावकरांनी त्यांचा पराभव केला.

अशा परिस्थितीत भाजपने गावकरांना पुन्हा उमेदवारी दिल्यास पावसकर काय भूमिका घेतात हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आरसेकर हे तिसरे महत्त्वाचे नाव म्हणून पुढे येत असल्याने सावर्डेतील राजकारण पुन्हा रंगदार झाले आहे. गावकऱ्यांच्या दृष्टीने परिस्थितीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे सध्या सभापतीपदाची प्रतिष्ठा आहे.

दूधसागरवर चालणाऱ्या सुमारे ४०० जीपवर पर्यटन विकास महामंडळाच्या अंतर्गत घेण्याच्या विषय सावर्डेत बराच गाजला होता. ४०० जीप मालकांचे कुटुंब हे सावर्डे मतदारसंघाचेच आहे. आमदार गावकर यांच्यामुळे हा विषय ताणला गेल्याचा दावा जीप मालक करतात.

सावर्डेचा गड टिकवण्यासाठी गावकरांना यावेळी केवळ विरोधंशीच नव्हे, तर स्वकीयांतील वाढत्या महत्त्वाकांक्षेशीही सामना करावा लागणार आहे. या राजकीय लढतीत आरसेकर किती पुढे जातात व पावसकर कोणाच्या बाजूला उभे राहतात, यावर सावर्डेच्या राजकीय भविष्याचा नवा पाना लिहिला जाण्याची शक्यता आहे.

आरसेकर यांचा युवा पिढीशी संपर्क...

पर्यायी युवा चेहरा संकेत आरसेकरांचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्यांची युवा प्रतिमा आणि नव्या पिढीशी असलेला संपर्क. सावर्डे मतदारसंघात गेल्या काही काळात युवक, सामाजिक उपक्रम आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक कामाच्या माध्यमातून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे गावकरांच्या विद्यमान राजकीय वजनाला पर्याय म्हणून भाजपमध्येच एखादा युवा चेहरा उभा राहू शकतो का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

आरसेकरांच्या आव्हानाचा परिणाम शक्य

आरसेकरांचे आव्हान गावकरांसाठी विरोधी उमेदवारापेक्षा वेगळे आहे. विरोधी पक्षाचा उमेदवार असल्यास गावकरांना पक्ष संघटना आणि सरकारच्या कामगिरीच्या आधारावर लढता येईल. परंतु भाजपमधीलच एक युवा चेहरा उमेदवारीचा दावा करू लागला तर समीकरण वेगळे असेल. पक्षातील कार्यकर्ते, युवा मतदार आणि स्थानिक पातळीवरील संघटनात्मक नेते कोणत्या दिशेने झुकतात, हा प्रश्न महत्त्वाचा ठरेल.

सावर्डे भाजपचा बालेकिल्ला नाही

सावर्डेत १९८९ पासूनच्या निवडणूक निकालांमध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, भाजप, काँग्रेस, तसेच अपक्ष उमेदवारही निवडून आले आहेत. १९८९ मध्ये मोहन आमशेकर, १९९४ मध्ये विष्णू प्रभु, १९९९ आणि २००२ मध्ये विनय तेंडुलकर, २००७ मध्ये अनिल साळगावकर, २०१२ मध्ये गणेश गावकर, २०१७ मध्ये दीपक पावसकर आणि २०२२ मध्ये पुन्हा गणेश गावकर असा सावर्डेचा राजकीय प्रवास आहे. त्यामुळे सावर्डेतील मतदारांचा कौल हा पक्षापेक्षा स्थानिक समीकरणे, उमेदवाराचा जनसंपर्क आणि निर्माण झालेली राजकीय लाट यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहिल्याचे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT