

पनवेल : मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा अभयारण्य परिसरात मंगळवारी सकाळी ‘मंकी ब्रिज’ कोसळल्याची घटना घडली. या मार्गावरून बॉयलर घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या धडकेने हा पूल कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती; मात्र वन विभाग तसेच वाहतूक पोलिसांनी तत्काळ धाव घेत मंकी ब्रिज बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
कर्नाळा अभयारण्य परिसरातून मुंबई-गोवा महामार्ग जातो. या अभयारण्यातील वन्यजीवांना महामार्ग सुरक्षितपणे ओलांडता यावा, यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मंकी रोप आणि साकवाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी सकाळी बॉयलर घेऊन जाणारे अवजड वाहन या मार्गावरून जात असताना मंकी ब्रिजला धडकले. या धडकेमुळे पुलाचा काही भाग कोसळला आणि महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
पूल कोसळल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला. परिणामी, मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती आणि वाहनचालकांना बराच वेळ अडकून राहावे लागले.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलाचा कोसळलेला भाग हटवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम तातडीने करण्यात आले.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अवजड वाहनाची धडक बसल्यामुळेच हा पूल कोसळला की अन्य काही कारण आहे, याबाबत संबंधित यंत्रणांकडून अधिक तपास केला जात आहे.