पणजी : पुढारी वृत्तसेवा
"पोलंड हा गोव्याकरिता एक महत्त्वाचा उदयोन्मुख पर्यटन बाजार आहे. पोलंडमधून वाढत असलेली उत्सुकता पाहून आम्हाला आनंद होत आहे. अधिक चांगली कनेक्टिव्हिटी, सुलभ प्रवास प्रक्रिया देण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रत्येक पर्यटकाला सुरक्षित, समाधानकारक आणि संस्मरणीय अनुभव मिळावा, हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी केले.
गोवा सरकारच्या पर्यटन विभागाने पोलंडमधून आलेल्या सुमारे ३७ सदस्यांच्या पर्यटन प्रतिनिधीमंडळाचे पर्यटन भवन येथे मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी या भेटीचा उद्देश आंतरराष्ट्रीय पर्यटन सहकार्य अधिक बळकट करणे आणि गोव्याच्या विविध पर्यटन क्षमतेचे सादरीकरण करणे हा होता.
या प्रतिनिधीमंडळाचे स्वागत उपसंचालक पर्यटन जयेश काणकोणकर, जीटीडीसीचे महाव्यवस्थापक गॅविन डायस, उपमहाव्यवस्थापक दीपक नार्वेकर आणि सहाय्यक पर्यटन अधिकारी चित्रा वेंगुर्लेकर तसेच पर्यटन क्षेत्रातील प्रतिनिधींनी केले. पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले, जे गोव्याच्या आतिथ्यशीलतेचे आणि आंतरराष्ट्रीय बाजारांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचे प्रतीक आहे.
गॅविन डायस यांनी गोव्याच्या पर्यटन संधींवर माहितीपूर्ण सादरीकरण केले. या सादरीकरणात गोव्याचा सांस्कृतिक वारसा, स्थानिक खाद्यसंस्कृती, साहसी पर्यटन, वेलनेस पर्यटन आणि प्रीमियम आतिथ्य सेवा यांचा आढावा देण्यात आला.
तसेच हवाई, सागरी, रेल्वे आणि रस्ते मार्गे गोव्याशी असलेली कनेक्टिव्हिटी आणि ई-व्हिसा सुविधेमुळे होणारी सुलभ प्रवास प्रक्रिया याबाबतही माहिती देण्यात आली. पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, पोलंडमधील पर्यटकांचा गोव्याकडे वाढता कल दिसून येत आहे. अशा भेटींमुळे प्रवाशांमध्ये गोव्याबद्दलची माहिती आणि विश्वास अधिक मजबूत होतो.