

पणजी: प्रभाकर धुरी
देशातील विविध मोबाईल, वेगवेगळे अॅप्स व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून जवळपास १६ अब्ज ऑनलाईन पासवर्ड हॅकर्सनी हॅक केले आहेत. अतिशय शांतपणाने हॅकर्स हे काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारत सरकारची राष्ट्रीय संघटना असलेल्या भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद संघटनेने (आयसीईआरटी) देशातील नागरिकांनी सायबर धोका लक्षात घेऊन आपले सगळे डिजिटल पासवर्ड तातडीने बदलून घ्यावे आणि प्रत्येकाने मल्टी लेव्हल ऑथेंटिकेशन करून सुरक्षित राहावे, असे आवाहन केले आहे. गोवा राज्याच्या सायबर विभागानेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. आयसीईआरटीकडील माहितीनुसार, हे पासवर्ड गेल्या ३ दशकांत हॅक करण्यात आले असून त्यांचा तो गोरखधंदा अजूनही सुरू आहे. एकदा का आपल्या मोबाईलचे अथवा सोशल मीडिया किंवा अॅप्सचे पासवर्ड हॅकर्सच्या हातात गेले की, त्याचा गैरवापर होण्याची भीती अधिक आहे. हॅकर्स आपल्या फोन आणि अॅप्समध्ये घुसखोरी करून डेटा चोरत आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात डेटा जमा होणार असल्याने आपण आता असुरक्षिततेच्या आणि धोक्याच्या पातळीवर आहोत. त्यामुळे पासवर्ड बदलण्याशिवाय आता आपल्यासमोर दुसरा पर्याय उरलेला नाही. आपली खासगी, कौटुंबिक, आर्थिक, व्यावसायिक माहिती त्यांच्या हातात गेली तर मोठा हलकल्लोळ माजण्याची शक्यता आहे. आपण वापरत असलेले गुगल अकाऊंट, फेसबुक, ईमेल, टेलिग्राम, विविध व्हीपीएन सर्व्हिसेस, अॅपल (जो सर्वाधिक सुरक्षित समजला जातो) फोन अशा सुमारे ३० ठिकाणांहून त्यांनी डेटा चोरी केली आहे. आपण अॅपला दिलेल्या एक्सेसमुळे आपल्या सगळ्या हालचालींवर त्यांचे लक्ष राहते. त्याने आपले अख्खे आयुष्य संकटात येऊ शकते. आपण सायबर गुन्हे आणि फसवणुकीला बळी पडू शकतो. त्यामुळे नागरिकांनी आपले पासवर्ड तत्काळ बदलावेत, ते किमान ३ महिने अथवा वर्षाने बदलावे, त्यासाठी मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन (उदा. पासवर्ड, पॅटर्न, फिंगरप्रिंट, फेस रेकसि वशन) करावे, जेणेकरून तुमच्याशिवाय कुणी पासवर्डला हात लावण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला पास की येऊ शकते. तसेच मोबाईल व संगणकाच्या सुरक्षिततेसाठी अँटी व्हायरस ऍप्लिकेशन वापरावे, असे आवाहनही आयसीईआरटीने केले आहे.
कॉमन पासवर्ड म्हणजे धोक्याची घंटा
बहुतेकवेळा बहुतेकजण सहज आपल्या लक्षात राहावे म्हणून कॉमन पासवर्ड (सर्रास वापरले जाणारे) वापरतात. असे दहा पासवर्ड हॅकर्सकडे असण्याची शक्यता आहे. तेच १० पासवर्ड आता सायबर धोक्याला कारण ठरले आहेत. हॅकर्स तेच पहिल्यांदा वापरून अकाऊंट हॅक करत आहेत. त्यामुळे ज्यांचे कुणाचे ते पासवर्ड असतील ते त्यांनी तातडीने बदलून घ्यावे.
या तीन स्टेप्स आणि पासवर्ड हॅक...
हॅकर्स पासवर्ड हॅक करण्यासाठी वेगवेगळ्या स्टेप्स वापरतात. पहिली स्टेप असते रेनबो टेबल, यात हॅकर्स कॉमन १० पासवर्ड वापरतात आणि सहजपणे पासवर्ड हॅक करतात. दुसरी स्टेप म्हणजे डिक्शनरी अटॅक, अनेकजण आपली किंवा कुटुंबातील सदस्याची जन्मतारीख किंवा नावे वापरतात. ती वापरून हॅकर्स पासवर्ड हॅक करतात. तिसरी स्टेप असते बूट फोर्ट. यात हॅकर्स फॉर्म्युलेशनचा वापर करतात. म्हणजे पासवर्ड हॅक करण्यासाठी कॅपिटल, स्मॉल अक्षरे, काही सिम्बॉल किंवा नंबर्स वापरून पासवर्ड हॅक करतात. काहीवेळा ते एका, तर काहीवेळा दहा सेकंदात पासवर्ड हॅक करतात, असे गोव्यातील सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विद्यानंद पवार यांनी सांगितले.