फोंडा : दहा कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्याच्या आमिषापोटी फोंड्यातील एका सराफी दुकानदाराला मुंबईतील पाच भामट्यांनी साडेसव्वीस लाख रुपयांना फसल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फोंडा पोलिस स्थानकात अवधूत रायकर यांनी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदाराला सराफी दुकान व्यवसायाच्या वृद्धीसाठी दहा कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. ही माहिती नवी मुंबई येथील रहिवासी श्वेता उंडारे यांना समजल्यानंतर तिने तक्रारदाराशी आपला भाऊ अहिरे टेक्नॉलॉजीसचा मालक नरेश अहिरे याच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर महाराष्ट्रातील रायगड येथील बजरंग मोहिते, तसेच मुंबईतील सौरभ टिकम व नीलेश पाटील यांची अहिरे याने ओळख करून दिल्यानंतर दहा कोटींचे कर्ज उपलब्ध करण्याचे मान्य करण्यात आले.
त्यानुसार फोंड्यातील तक्रारदाराच्या सराफी दुकानाची पाहणी करून एक सर्वेक्षण अहवाल तयार करण्यासाठी प्रत्यक्ष भेट देणे आवश्यक आहे, अशी बतावणी करून तक्रारदाराला या सर्वांची फी म्हणून दीड लाख रुपये देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदाराने नेफ्टच्या स्वरूपात दीड लाख रुपये संबंधितांच्या बँक खात्यात वर्ग केले.
एवढे सर्व करूनही तक्रारदाराला दहा कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करण्यास हे पाचही जण अपयशी ठरल्यामुळे तक्रारदाराने पैसे व कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी संशयित आरोपींनी नकार दिला. व्यवसायाची बदनामी करू, अशी धमकीच दिली. शेवटी आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यावर फोंडा पोलिसांत सराफाने तक्रार नोंदवली असून, फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.
आवश्यक कागदपत्रेही संशयित आरोपींकडे
पैसे मिळाल्यानंतर संशयित आरोपी बजरंग मोहिते, सौरभ टिकम व नीलेश पाटील हे तिघेही फोंड्यात आले. त्यांनी व्यवसायाची पाहणी केली. सर्वेक्षण अहवाल तयारही केला. आता कर्ज वितरित करण्यापूर्वी तक्रारदार सराफाला पंचवीस लाख रुपये संशयित आरोपींना वर्ग करण्याची सूचना करण्यात आली. हे पंचवीस लाख दहा कोटी रुपयांचे कर्ज वितरित केल्यानंतर परत केले जातील, असे सांगण्यात आले. शिवाय कोरे धनादेश, प्रॉमिसरी नोट्स आदींचीही मागणी तक्रारदार सराफाकडे करण्यात आली. कर्जाच्या आशेने तक्रारदाराने पंचवीस लाख रुपये व इतर आवश्यक कागदपत्रेही संशयित आरोपींकडे सुपूर्द केली.