चावडी : संजय कोमरपंत
कुणाला कसले छंद असेल ते सांगता येत नाही. काणकोण शेळेरमधील पेरपेत जाकीस या ८० वर्षांच्या आजीने तर आपल्या विविध खेळांच्या छंदामुळे व विविध स्पर्धांत भाग घेण्याकरीता म्हातारपणाची आपली पुंजी खर्च केली. पेरपेत जाकीस यांना तरुणपणपासूनच विविध क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याची आवड होती.
त्या फुटबॉल खेळायच्या. तसेच शॉटपुट स्पर्धा असो वा धावण्याची स्पर्धा असो त्यात त्या भाग घ्यायच्या. या स्पर्धा काणकोणात नव्हे, गोव्याच्या इतर भागात नव्हे, देशाच्या कोणत्याही राज्यात असो व विदेशात असो पेरपेत यांनी सहभाग घेऊन आपला छंद जोपासला आहे.
गोव्याच्या विविध भागात झालेल्या स्पर्धेत भाग घेतानाच देशाच्या चेन्नई, हैदराबाद, पुणे, दिल्ली, बंगळुरू, गुंटूर येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत भाग घेतला. तेथे १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे तसेच शॉटपुट, टेनिस बॉल थ्रो या स्पर्धांत भाग घेऊन कधी प्रथम, तर कधी द्वितीय बक्षिसे मिळविली आहेत.
देशाच्या विविध राज्यांत आपल्या क्रीडा क्षेत्रातील चमक दाखवितानाच त्यांनी श्रीलंका, चीन, मलेशिया या देशातही आयोजित क्रीडा स्पर्धांत भाग घेऊन पारितोषिके मिळविली आहेत. चीन, श्रीलंका, मलेशिया येथे झालेल्या मास्टरमिट स्पर्धेत त्यांनी भारतातर्फे भाग घेऊन बक्षिसे मिळविली आहेत.
गोवा मास्टर्स अॅथलेटिक असोसिएशनतर्फे तिने देश, विदेशात आपल्या क्रीडा छंदाची चमक दाखविली आहे. याकामी तिला गोवा मास्टर्स अॅथलेटिक असोसिएशनची उपाध्यक्ष अनिता रोड्रिगिस व प्रशिक्षक देवी गावकर यांचे पूर्ण सहकार्य मिळाल्याचे श्रीमती जेकिस सांगतात. काणकोणच्या सरकारी इस्पितळात दाईच्या कामावरून निवृत्त झाल्यानंतर तिने आपल्या खेळाचा छंद पूर्ण करण्याकरीता निवृत्तीनंतर मिळालेली निवृत्ती पुंजी आपला छंद पूर्ण करण्याकरीता देश विदेशात खेळण्यास जाण्यास खर्च केली आहे. तिचे दोन्ही पुत्र सुद्धा क्रीडापटू असून आईच्या मार्गदर्शनाखाली आल्बर्ट व विली सुद्धा उत्तम फुटबॉल व बॅडमिंटन खेळाडू आहेत.
विदेश दौरे न परवडणारे...
खेळाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवून राहिलेल्या पेरपेत जाकीस यांनी क्रीडा क्षेत्राला उत्तेजन देण्याकरीता आता क्रीडा साहित्य विकण्याचे दुकान सुद्धा काणकोणात सुरू केले आहे. आपण इतर देशात सुद्धा आपल्या क्रीडा गुणांची चमक दाखवू इच्छित होते. मात्र, विदेशात जाण्यासाठी विमान तिकिट खर्च व इतर खर्च आता परवडत नाही, असे या पेरपेत जाकीस सांगतात. आर्थिक चणचणीमुळे सध्या आपल्या क्रीडा छंदाच्या आवडीला विराम दिलेला आहे. मात्र, गोव्यात तसेच देशाच्या विविध भागात ज्या स्पर्धा होतात, तेथे मात्र सहभाग घेत असल्याच्या त्या सांगतात.