Pernem Resort Fire Case  
गोवा

Pernem Resort Fire Case | पेडणे हादरले! आश्वे-मांद्रे येथील आलिशान कॉटेजेसना भीषण आग; 6 ते 7 कॉटेजेस जळून खाक

Pernem Resort Fire Case | कारण अस्पष्ट; लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज, अग्निशमन दलाची तत्परता

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

आश्वे-मांद्रे येथील आजोबा मंदिराजवळील दलाल बीच रिसॉर्ट परिसरातील आलिशान कॉटेजेसना गुरुवारी रात्री सुमारे पावणे नऊच्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या परिसरातील ६ ते ७ कॉटेजेस आगीत जळून खाक झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. अग्निशामक दलाला माहिती देण्यात आली असली तरी बंब उशिराने घटनास्थळी पोहोचल्याने तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.

नंतर पेडणे व म्हापसा येथून आलेल्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेवेळी कॉटेजेसमध्ये कोणीही वास्तव्यास नसल्याने मोठी जीवितहानी टळली. काही पर्यटकांनी कॉटेजेस बुक केली असली तरी ते त्या वेळी बाहेर गेले होते. काहींनी आत असलेले सामान वाचवण्याचा प्रयत्नही केला.

सीआरझेडचे उल्लंघन

दरम्यान, संबंधित कॉटेजेस सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यापूर्वी या बांधकामांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. पंचायतस्तरावर नोटीस देऊन कारवाईचे आदेशही देण्यात आले होते; मात्र संबंधितांनी स्थगिती मिळवली होती.

कॉटेजेसना पंचायतीकडून कोणत्याही प्रकारचे परवाने देण्यात आले नव्हते. तसेच येथे बेकायदेशीररित्या रेस्टॉरंट व इतर सुविधा सुरू असल्याने परिसर सील करण्याची तयारी होती.
किरण सावंत, सरपंच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT