पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उत्पल पर्रीकर Pudhari
गोवा

Panaji Municipal Election | भाजप सरकारमधील मंत्र्यांविरोधात पॅनल; घराणेशाही व भ्रष्टाचाराविरुद्ध लढ्याची उत्पल पर्रीकरांची घोषणा

Utpal Parrikar | ‘आम्ही पणजीकर’ या नावाने स्थापन केलेले पॅनल कोणत्याही पक्षाविरोधात नसून पणजीतील अनाचाराविरोधात

पुढारी वृत्तसेवा

Goa BJP internal conflict

पणजी : पणजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्पल मनोहर पर्रीकर यांनी भाजप सरकारमधील मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधात स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. घराणेशाही आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठीच हे पॅनल स्थापन केल्याचा दावा त्यांनी केला.

पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पर्रीकर म्हणाले की, “चांगले प्रशासन देणे, तसेच महापालिकेतील भ्रष्टाचार आणि घराणेशाही संपवणे हा आमचा उद्देश आहे. ‘आम्ही पणजीकर’ या नावाने स्थापन केलेले पॅनल कोणत्याही पक्षाविरोधात नसून पणजीतील अनाचाराविरोधात आहे.”

या वेळी विद्यमान नगरसेवक व माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, माजी महापौर वैदेही नाईक, माजी नगरसेवक निमीन डिक्रुझ आणि ताळगावचे नेते दत्तप्रसाद नाईक उपस्थित होते.

‘युनायटेड पणजीकर’ पॅनलच्या बॅनरचे अनावरण केल्यानंतर पर्रीकर म्हणाले की, “पणजीच्या हितासाठी विविध पक्षांतील नेते एकत्र आले आहेत. आमचे पॅनल भाजपविरोधी नसून मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आपल्या पुत्राला पणजीकरांवर लादण्याच्या प्रयत्नांविरोधात आहे. आम्ही घराणेशाहीविरोधात ठाम आहोत. आमच्या पॅनलमध्ये ज्येष्ठांसोबत नवोदित उमेदवारांनाही संधी दिली जाईल. योग्य वेळी उमेदवारांची घोषणा करू.”

महापालिकेत सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे आणि त्यामुळे आमचे पॅनल शंभर टक्के यश मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व जागांवर निवडणूक लढवण्याचा आमचा मानस असून, एखाद्या प्रभागात सत्ताधारी गटाविरोधात सक्षम उमेदवार असल्यास त्याला पाठिंबाही दिला जाऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

2022 च्या विधानसभा निवडणुकीत केवळ 20 दिवस प्रचार करूनही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला. यावरून पणजीकरांना बदल हवा आहे, हे स्पष्ट होते. दबावाचे राजकारण संपवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. मोन्सेरात यांना 15 नगरसेवक का बदलावे लागले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सुरेंद्र फुर्तादो म्हणाले की, “गेल्या वर्षभरापासून आम्ही सत्ताधाऱ्यांविरोधात नियोजन करत होतो. राजकीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही पणजीच्या हितासाठी एकत्र आलो आहोत. एकास एक लढत देऊ. शहरात प्रदूषण वाढले असून दूध व मासळीच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आहेत. आमदार व महापालिकेचे या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.”

दत्तप्रसाद नाईक म्हणाले की, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कधीही घराणेशाहीला प्रोत्साहन दिले नाही. त्यांनी बहुजन समाजातील युवकांना संधी दिली. आपल्या पुत्राला कधीही पद दिले नाही. त्यामुळे पणजीकरांनी उत्पल यांच्या पाठीशी उभे राहावे. ताळगाव मतदारसंघातील आठ प्रभागांत आम्ही निश्चित चांगले काम करून दाखवू.”

कॅसिनोविषयी पुनर्विचाराचा संकेत

पॅनल सत्तेवर आल्यास कॅसिनोविरोधी नागरिकांशी चर्चा करून महापालिकेच्या अखत्यारीतील बाबींवर निर्णय घेतला जाईल. कॅसिनो हटवण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना आमचा पाठिंबा असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.

दबावाच्या राजकारणाचा आरोप

पॅनल स्थापन केल्याचे कळताच मंत्री मोन्सेरात हतबल झाले असून आमच्या उमेदवारांवर दबाव टाकला जात आहे, असा आरोप नाईक यांनी केला. उमेदवारांना महापालिकेकडून दिली जाणारी प्रमाणपत्रे व दाखले देण्यास टाळाटाळ होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT