

पणजी : पुढारी वृत्तसेवा
ला मारिवेल, दोना पावला येथील खासगी कॉलनीतील मोकळ्या जागेत पणजी महानगरपालिकेकडून होणाऱ्या अतिक्रमणाविरोधात स्थानिकांनी दंड थोपटले आहेत. खुल्या जागेतील कचरा उचलण्यासाठी आलेला जेसीबी आणि डंपर त्यांनी रोखून धरला आणि तुम्ही महानगरपालिकेच्या आदेशावरून काम करण्यासाठी आला असाल, तर कामाचे लेखी आदेश दाखवा, असा आग्रह धरला.
कामाचा आदेश न दाखवता खासगी कॉलनीच्या मोकळ्या जागेत अतिक्रमण केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करून तुम्हाला काम करायचे असेल तर काय काम करणार आहात त्याची माहिती द्या, अशी मागणी केली.
दरम्यान, खासगी कॉलनीच्या खुल्या जागेत झालेल्या अतिक्रमणाविरुद्ध ला मार्वल रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष अजॉय बॅरेटो यांनी २२ जानेवारीला महानगरपालिकेला पत्र पाठवले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, महानगरपालिकेचे अभियंता धीरज यांनी असोसिएशनच्या सदस्यांसोबत अतिक्रमण झालेल्या जागेची संयुक्त पाहणी करावी व ही तपासणी कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय व्हावी म्हणून पोलिस बंदोबस्तही ठेवावा अशी मागणीही केली आहे. यापूर्वी दिलेल्या पत्रांची दखल न घेतल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे पत्रात म्हटले आहे.
आयुक्तांकडून कारवाई नाही :
सेसिल रॉड्रिग्ज सामाजिक कार्यकर्त्या सेसिल रॉड्रिग्ज यांनी रहिवाशांच्या भूमिकेचे समर्थन केले असून महानगरपालिकेकडून होणाऱ्या अतिक्रमणाबाबत संताप व्यक्त केला आहे. महापालिका आयुक्तांना लेखी पत्र देऊनही काहीच कार्यवाही न केल्याबद्दल किंवा पत्राचे उत्तर न दिल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.