Goa Shigmotsav 2026 |  
गोवा

Goa Shigmotsav 2026 | गोव्यात शिमगोत्सवाचा उत्साह! पणजी बाजारपेठा सज्ज; खरेदीसाठी गर्दी

Goa Shigmotsav 2026 | शिमगोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारात आबालवृद्धांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

शिमगोत्सव म्हणजे रंगोत्सव ! वेगवेगळ्या रंगांची उधळण करीत नात्यांमध्ये अनेक रंग भरायचा काळ. जुने जाऊ द्या, मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका, असे म्हणत नात्यांमधील वाद संपवण्याचा हाच महोत्सव.

हा महोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी राज्यातील आबालवृद्ध तयार आहेत. त्यानिमित्ताने पणजी बाजारपेठही विविध साहित्यांनी सजली आहे. बाजारपेठेत पारंपरिक आणि नैसर्गिक रंग दाखल झाले आहेत. शिवाय लहान मोठ्या पिचकाऱ्या, चित्रविचित्र रंगीबेरंगी मुखवटे छोट्यांपासून मोठ्यांना वापरता येतील अशी वेगवेगळी टी शर्टस् उपलब्ध आहेत.

या स्टॉलकडे छोटी मुले अधिक आकर्षित होत आहेत. त्यामुळे त्यांना घेऊन अनेक पालक बाजारात फेरी मारीत आहेत. एकदम छोट्या मुलांपासून मोठ्या माणसांना होतील अशी टी शर्टस् अगदी ५० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. पिचकारी ८० रुपयांपासून सुरू होत आहे.

बंदुकीच्या लहान आणि बंद छत्रीसारख्या मोठ्या आकारात पिचकाऱ्या उपलब्ध आहेत. त्यांची किंमत अगदी ५०० रुपयांपर्यंतही आहे. त्यावरील कलाकुसर पिचकाऱ्यांना महाग बनवत आहे. वेगवेगळे अक्राळ विक्राळ व छोटे मोठे मुखवटे १०० रुपयांपासून विक्रीला ठेवण्यात आले आहेत.

रंगीबेरंगी पारंपरिक गुलाल ५० रुपये पाव किलो दराने विकला जात आहे, तर छोट्या मोठ्या गिफ्ट हॅम्परमध्ये पॅक केलेला नैसर्गिक रंग वेगवेगळ्या पॅकेटमधून त्यात उपलब्ध करून दिला आहे.

अगदी १५० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत हा पॅक २५० ते ५०० ग्रॅम वजनात मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून रासायनिक रंगांमुळे त्वचा, डोळे यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत.

वेगवेगळ्या प्रांतातील लोक स्टॉलवर

वेगवेगळ्या प्रांतातून नोकरी, व्यवसायासाठी अनेकजण राज्यात आले आहेत. त्यांनीही बाजारात हजेरी लावली असून रंग, पिचकारी खरेदी करण्यासाठी त्यांचीही पावले शिमगोत्सवासाठी खास उघडल्या गेलेल्या बाजाराकडे वळली आहेत. त्यांच्याकडूनही रंगांसह अन्य साहित्याची खरेदी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT